लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला तीन वर्षे उलटली तरी अद्यापही सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलेले नाही अथवा ती केस बंददेखील केलेली नाही. यामुळे सीबीआयची आजवरची कारवाई गुलदस्त्यात राहिली आहे. १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला. त्या घटनेला बुधवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत.
तीन वर्षांपूर्वी लॉकडाउनच्या काळात सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरात आढळून आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या मृत्यूचा तपास सुरू केला होता. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्याशी संबंधित अनेकांचा जबाब नोंदवला होता. यामध्ये काही चित्रपट अभिनेत्यांचा देखील समावेश होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली होती. तसेच त्याच्या शवविच्छेदन अहवालात त्याने आत्महत्या केल्याचे संकेत मिळाले होते. मुंबई पोलिसांप्रमाणेच बिहार पोलिसांनी देखील समांतर तपास केला होता. यादरम्यान सुशांतने आत्महत्या केली की हत्या, असा बराच वादंग झाला होता. त्यानंतर त्याच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सुपुर्द करण्यात आला होता. त्यानंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने देखील ऑक्टोबर २०२० मध्ये त्याचा व्हिसेराची पुनर्तपासणी केली होती व त्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले.
मॅनेजरचा मृत्यू, रियाचा जबाब
सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्याची मॅनेजर दिशा सॅलियन हिचा देखील मृत्यू झाला होता. त्यातच सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी सुशांतच्या मृत्यूला त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती कारणीभूत असल्याचा दावा करत तिच्या व तिच्या कुटुंबाविरोधात पोलिस तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयने रिया चक्रवर्ती हिचा देखील जबाब नोंदवला होता. याप्रकरणी सीबीआने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.