दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आज हयात नसला तरी तो आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. १४ जून २०२० रोजी सुशांत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचा मृत्यू प्रकरणावरुन मोठा गदारोळ उडाला. पण आजही त्याच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. सुशांतच्या मृत्यूला आज 4 वर्ष झाली आहेत. सुशांतसाठी आजही त्याचे कुटुंबीय न्याय मागत आहेत. सुशांतची बहिण श्वेता सिंगने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
आज सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त श्वेता सिंग कीर्तीने पुन्हा एकदा व्यवस्थेकडे न्यायाची मागणी केली आहे. तिने सुशांतचा एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सुशांत त्याच्या बहिणींसोबत मजा-मस्ती करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत श्वेताने एक भावूक नोट लिहिली आहे.
श्वेताने लिहिलं, 'भाई, तू आम्हाला सोडून गेलास, त्याला आज ४ वर्षे झाली आहेत. अजूनही आम्हाला १४ जून २०२० ला नेमकं काय झालं होतं, हे कळालेलं नाही. आमच्यासाठी तुझा मृत्यू अजूनही एक गूढ आहे. मला असहाय्य वाटतंय. सत्य जाणून घेण्यासाठी कित्येक अधिकाऱ्यांना मी विनंती केली. पण, आता मी धीर गमावत चालले आहे. असं वाटतं सर्व काही सोडून द्यावं, हार मानावीशी वाटतेय'.
श्वेताने पुढे लिहिले की, 'आज, शेवटचं मला या प्रकरणात मदत करू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारायचं आहे, तुम्ही स्वतःच्या हृदयावर हात ठेवा आणि स्वतःला विचारा, आमचा भाऊ सुशांतचं काय झालं हेसुद्धा जाणून घ्यायचा आमचा हक्क नाही का? हा एक राजकीय अजेंडा का बनला आहे? त्यादिवशी जे काही सापडलं असेल आणि जे काही घडलं असेल ते सहजतेने का सांगितलं जात नाहीये. मी विनंती करतेय की सत्य सांगून आमच्या कुटुंबाला पुढे जाण्यास मदत करा', असं श्वेताने पोस्टमध्ये लिहलं आहे.
श्वेताने आणखी एका पोस्टमधून सुशांत अन्यायाला पात्र आहे का? असं विचारलं आहे. तिने लिहिलंय की, 'या क्रूर जगात इतकं प्रेमळ आणि निर्मळ असणं ही त्याची चूक होती का? सुशांतवर अन्याय होऊन चार वर्षे झाली. तो ह्यासाठी खरंच पात्र आहे का?'. या पोस्टवर सुशांतच्या चाहत्यांनीदेखील न्यायाची मागणी केली आहे.