बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी तीसहून अधिक जणांचा जबाब नोंदवला आहे. या चौकशी दरम्यान आता पोलिसांनी मानसोपचार तज्ज्ञांचेही स्टेटमेंट घेतले आहे. ज्यात खळबळजनक खुलासा समोर आला आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मधील डिसेंबर महिन्यानंतर सुशांतने डिप्रेशनसाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेण्यास सुरूवात केली होती. मानसोपचार तज्ज्ञांनी जबाब नोंदवताना दिलेल्या माहितीनुसार सुशांतला बायपोलर डिसऑर्डर हा आजार होता. तर, इतर डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार गेल्या काही काळापासून सुशांत डिप्रेशनचा सामना करत होता. पण, त्याच्या डिप्रेशनचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे आता डॉक्टरांकडून मिळालेली माहिती पोलिसांना पेचात टाकून गेली आहे.
सायंटिकफिक भाषेत बायपोलर डिसऑर्डर हा एक असा मानससिक आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या वागण्यात अतिशय वेगाने बदल होऊ लागतात. या आजाराला गंभीर स्वरुपाचे डिप्रेशन म्हटले जाऊ शकते. मुख्य म्हणजे आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरही सुशांतला विश्वास नसल्याचे म्हटले जाते. ज्यामुळे तो एका डॉक्टरची जास्तीत जास्त २ किंवा ३ वेळाच भेटत असे. सुशांतवर उपचार करणाऱ्या जवळपास सर्वच डॉक्टरांच्या माहितीनुसार औषधे घेण्याच्या त्याच्या वेळांमध्ये अनियमितता होती. अखेरच्या वेळी त्याने ज्या डॉक्टरांकडून उपचार घेतले तेव्हा त्याच्यावर बायपोलर डिसऑर्डरचा उपचार सुरु होता.