बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे जुने नाते राहिले आहे. एकेकाळी अख्खे बॉलिवूड अंडरवर्ल्डच्या दहशतीखाली होती. अनेक गँगस्टर चित्रपटात पैसा गुंतवत आणि दिग्दर्शक खंडणी देत. बॉलिवूडला अंडरवर्ल्डपासून मुक्ती देण्यात माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
1988 मध्ये सुषमा स्वराज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री होत्या. या काळात त्यांनी बॉलिवूडच्या फिल्म प्रॉडक्शन ते फिल्म इंडस्ट्री बनण्यापर्यंतच्या प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सुषमा स्वराज यांनी सिनेमाला उद्योगाचा दर्जा प्रदान केला. यामुळे भारतीत फिल्म उद्योगाला बँकेकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
उद्योगाचा दर्जा नसल्यामुळे सिनेमा प्रॉडक्शनवर गँगस्टर्सचा ताबा होता. सुषमा स्वराज यांच्या अथक प्रयत्नांमुळे सिनेमाला उद्योगाचा दर्जा मिळाला. याचे संपूर्ण श्रेय सुषमा स्वराज यांना जाते.
सुषमा स्वराज एक धडाडीच्या नेत्या होत्या. प्रत्येकाच्या मदतीसाठी त्या तत्पर असत. बॉलिवूडसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बॉलिवूड स्टार्सच्या अनेक कौटुंबिक सोहळ्यांना त्या हजर असत. सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.