Join us  

खिळवून ठेवणारा सस्पेन्स थ्रिलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 3:24 AM

मराठी चित्रपटांत सध्या विविध विषय हाताळले जात आहेत आणि प्रत्येक नव्या चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार याची उत्कंठा वाढवण्यातही मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे.

(मराठी चित्रपट)- राज चिंचणकरमराठी चित्रपटांत सध्या विविध विषय हाताळले जात आहेत आणि प्रत्येक नव्या चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार याची उत्कंठा वाढवण्यातही मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे. ‘७, रोशन व्हिला’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच एकप्रकारची उत्सुकता निर्माण होते आणि त्यातले गूढत्व अधिक वाढत जाते. हे गूढ कायम ठेवत या ‘रोशन व्हिला’च्या निमित्ताने मराठीत बऱ्याच कालावधीनंतर एक सस्पेन्स थ्रिलर कहाणी आली आहे. चित्रपटाच्या नेटक्या मांडणीने त्यात भरच घातली असून, खुर्चीला खिळवून ठेवण्याचे कामही ताकदीने पार पाडले आहे.राजस आणि रेणू हे एक जोडपे ‘७, रोशन व्हिला’ या बंगल्यात सुटीसाठी येतात. पण तिथे रेणूला विचित्र भास होत राहतात. रेणूला मधूनच काहीतरी आठवते आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती तिला प्रत्यक्ष दिसत राहतात. या एकूणच प्रकारामुळे ती फार गोंधळून गेलेली असते. तिला हे भास का होतात, याचे कारण तिच्या भूतकाळात दडलेले असते. यात तिसरा एक धागा आहे तो रतीचा, म्हणजे रेणूच्या बहिणीचा! तो एक वेगळाच सस्पेन्स आहे. रेणूच्या एकंदर वर्तणुकीचे कारण म्हणजे केवळ तिला होणारे भासच आहेत की आणखी काही, हे चित्रपटाच्या शेवटी उघडकीस येते. पण तोपर्यंत या कथेत गुंतवून ठेवण्याचे काम मात्र चित्रपटाने चोख करून ठेवलेले असते. श्रीनिवास भणगे यांच्या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे आणि त्याची पटकथा व संवादलेखनही त्यांनीच केले आहे. परिणामी, माध्यमांतर करताना नक्की काय द्यायचे, या त्यांच्या स्पष्ट आराखड्याला अजिबात धक्का न लागू देता दिग्दर्शक अक्षय दत्त याने तो पडद्यावर मांडला आहे. सस्पेन्स थ्रिलर हाच या चित्रपटाचा बाज आहे आणि तेवढेच गूढत्व पदोपदी कायम ठेवत त्यांनी केलेले रंगकाम आकर्षून घेणारे आहे. हा चित्रपट म्हणजे नाटक वाटत नाही, हेही महत्त्वाचे! लक्षपूर्वक पाहिल्यास कदाचित यातला सस्पेन्स कुठेतरी ओळखीचा वाटून जाईलही; पण त्याचा खेळ मात्र चांगल्या पद्धतीने यात खेळला गेला आहे. फक्त चित्रपटाच्या पूर्वार्धात येणारे, कथेची पार्श्वभूमी सांगणारे प्रसंग कमी करता आले असते; तर चित्रपट अधिक बंदिस्त झाला असता. पण असे असले तरी हा चित्रपट ज्या तऱ्हेने अंगावर येतो, त्याला फुल मार्क्स द्यावे लागतील. पार्श्वध्वनीचा योग्य वापर यात केला गेला आहे. महेश अणे यांचे छायाचित्रण नजर खिळवून ठेवणारे आहे, तर भक्ती मायाळू यांचे संकलनही यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे आहे.अभिनयाच्या पातळीवर हा चित्रपट केवळ आणि केवळ तेजस्विनी पंडितचा आहे. रेणूची मध्यवर्ती भूमिका साकारताना तिने जे काही विभ्रम दाखवले आहेत; त्यातून तिची परिपक्वता थेट समोर येते. कथेचा पूर्ण फोकस तिच्यावरच असल्याने तिची जबाबदारी मोठी होती आणि तिने ती ज्या प्रकारे पार पाडली आहे, ती निव्वळ अनुभवण्याजोगी गोष्ट आहे. प्रसाद ओक याने तेजस रंगवताना मस्त अदाकारी पेश केली आहे. चित्रपटातला तिसरा कोन असलेली रतीची व्यक्तिरेखा सोनाली खरे हिने दमदार साकारली आहे. बऱ्याच दिवसांनी तिचे होणारे दर्शन सुखावणारे आहे. सविता मालपेकर, प्रदीप वेलणकर यांचीही कामगिरी छान आहे. मराठीत बऱ्याच दिवसांनी असा सस्पेन्स चित्रपट आला आहे आणि त्यातला थरार अनुभवायचा असल्यास या ‘रोशन व्हिला’चे दार उघडावेच लागेल.