Join us

...म्हणून मी ही भूमिका स्वीकारली! 'छावा'मध्ये कान्होजी शिर्के साकारण्यावर अखेर सुव्रतने सोडलं मौन, सांगितलं खरं कारण

By कोमल खांबे | Updated: April 12, 2025 15:49 IST

कान्होजी शिर्केंची भूमिका साकारल्यामुळे सुव्रतला ट्रोलही केलं गेलं. अखेर आता यावर अभिनेत्याने मौन सोडत ही भूमिका साकारण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. 

छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास दाखवणारा 'छावा' सिनेमा फेब्रुवारी महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पण, सिनेमात कान्होजी शिर्के या निगेटिव्ह भूमिकेत सुव्रत जोशीला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कान्होजी शिर्केंची भूमिका साकारल्यामुळे सुव्रतला ट्रोलही केलं गेलं. अखेर आता यावर अभिनेत्याने मौन सोडत ही भूमिका साकारण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. 

सुव्रतने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने कान्होजी शिर्के ही भूमिका त्याच्याकडे कशी आली याबाबत सांगितलं आहे. शिवाय छावा सिनेमात निगेटिव्ह पात्रात दिसण्याबाबत त्याने मौन सोडलं आहे. 

सुव्रत जोशीची पोस्ट 

"हम नमक है महाराज, तुम तिलक हो हमारे माथे का"

ह्या चित्रपटाचा भाग असल्याचा आनंद आहे. चित्रपटगृहात गाजल्यानंतर आता हा चित्रपट Netflix वर देखील प्रदर्शित झाला आहे. तरी रसिकप्रेक्षकांनी आनंद घ्यावा… 

छावा प्रदर्शित झाल्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेक प्रेमाने, कौतुकाने भरलेले संदेश. तर काही दाहक, राग राग करणारे...मला ते अपेक्षितच होते. किंबहुना तीच माझ्या कामाची पावती होती असे मी समजतो. पण तरीही काहींनी अगदी व्याकुळतेने “मी ही भूमिका का स्वीकारली”असे विचारले. तर त्याविषयी थोडेसे...

सर्वप्रथम एखादी भूमिका तुम्हाला विचारली जाते तेव्हा समोर अनेक भूमिकेचे पत्ते टाकून, तुम्हाला कुठली भूमिका हवी तो पत्ता उचला अश्या पद्धतीचे स्वातंत्र्य तुम्हाला नसते. त्यामागे दिग्दर्शक, निर्माते आणि कास्टिंग डायरेक्टर यांनी भरपूर वेळ घालवलेला असतो. विचारांती तुम्हाला एकच भूमिका दिलेली असते. तशी ही भूमिका माझ्याकडे चालून आली. आता कुठलीही भूमिका निवडताना मी फक्त "नाट्यशास्त्राचे" ऐकतो. नाट्यशास्त्र भूमिकेचेवर्णनात "पात्र" असे करते. त्यामुळे कुठलीही गोष्ट, भावना, व्यक्ती धारण करणे हा नटाचा धर्म असतो. पण मग उठून कुठलीही भूमिका करावी का? तर अजिबातच नाही. तर मी ज्या कलाकृतीचा भाग होणार आहे ती कलाकृती व्यापक अर्थाने काय सांगू पाहती आहे याचा विचार आपण करायचा. ती कलाकृती हे सांगते आहे ते आपल्याला पटत असेल तर मग त्या कलाकृतीत आपल्याला कुठल्याही ढंगाची भूमिका आली तरी मी स्वीकारतो. कारण अंतिमतः आपण एक चांगली गोष्ट पोहोचवायला हातभार लावतोय. 

अहो अगदी शाळेच्या नाटकातही कुणाला तरी लबाड कोल्हा तर कुणाला म्हातारी व्हावे लागतेच. स्वत्व सोडून परकाया प्रवेश हे आमचे कर्तव्य आणि आमची चैन आहे. त्याला अनुसरून मी आमच्या नाट्यधर्माचे पालन करतो. माझा अल्प अनुभव आणि शिक्षण असे सांगते की हे करणे प्रगल्भ नटाचे लक्षण आहे. 

सुव्रतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, थिएटर गाजवल्यानंतर छावा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा आता पाहण्यासाठी उपलब्ध आहे. 

टॅग्स :सुव्रत जोशी'छावा' चित्रपटमराठी अभिनेता