2004 साली आलेल्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'स्वदेस' (Swades) सिनेमाने बॉलिवूडमध्ये एक बेंचमार्क सेट केला.आगळावेगळा विषय, सुंदर अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. आशुतोष गोवारीकर (Ashurosh Gowariker) यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. तर शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली होती. 'स्वदेस'च्या आठवणी ताज्या करायचं कारण म्हणजे या चित्रपटाची कथा 90 च्या दशकातील एका शोमधून आली होती. विशेष म्हणजे त्या शोमध्ये आशुतोष गोवारीकर यांनी मोहनची भूमिका साकारली होती.
स्वदेसची कथा नासामध्ये काम करणाऱ्या मोहन या भारतीय वैज्ञानिकावर आधारित आहे. मोहन या व्यक्तीची भूमिका शाहरुख खानने साकारली आहे. मोहनच्या लहानपणी त्याची काळजी घेणाऱ्या कावेरी अम्माला अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी तो भारतात येतो. उत्तरप्रदेश मधील चरणपूर या छोट्या गावात कावेरी अम्मा राहत असते. गीता ही मुलगी त्यांची काळजी घेत असते. मोहन गावात येतो आणि इथल्या समस्या पाहतो तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटते. कावेरी अम्मा, गावातील लोक, बालपणीची मैत्रिण गीता यांच्या तो खूप जवळचा होतो. गावातील असलेली विजेची समस्या त्याला सोडवायची असते.तो एक छोटी जलविद्युत योजना सुरु करतो. नासामधील प्रोजेक्ट पूर्ण करुन तो पुन्हा भारतात येऊन राहायचं ठरवतो. देशाविषयीचं प्रेम या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे.
ट्विटर युझर मीमांसा शेखर यांनी 'वापसी' शोचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यामुळे सिनेरसिकांना आश्चर्य वाटेल अशी माहिती यातून मिळाली आहे. हा सिनेमा खरं तर झी टीव्हीवरील 'वापसी' या मालिकेवरुन घेण्यात आला होता. १९९३-९४ मध्ये हा शो प्रसारित झाला होता. या मालिकेत आशुतोष गोवारीकर यांनीच मोहन ही भूमिका साकारली होती. इतकंच नाही तर कावेरी अम्मा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांनी सिनेमा आणि मालिका दोन्हीतही काम केलं आहे. आशुतोष गोवारिकर यांच्या 'वापसी' शोचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
'स्वदेस'मध्ये शेवटी मोहन गावातील विजेची समस्या दूर करतो. सिनेमातील हा टर्न एका सत्य परिस्थितीवरुन घेण्यात आला आहे. अरविंदा पिल्ललामरी आणि रवी कुचिमंची हे NRI कपल महाराष्ट्रातील बिळगाव या छोट्याशा गावात पेडल पॉवर प्लांट सुरु करुन गावातील लोकांची विजेची समस्या दूर करतं.'स्वदेस'चा शेवट याच सत्यघटनेवरुन घेण्यात आला आहे.