Join us

'मी आई अन् बाबा वेगवेगळे राहतो कारण...' स्वानंदी टिकेकरने केला खुलासा, म्हणाली, 'आम्ही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 16:21 IST

आम्ही कधी कधी ३-४ दिवस बोलतही नाही.

मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचली. स्वानंदीचे वडील उदय टिकेकर हे लोकप्रिय अभिनेते आहेत तर तिची आई आरती टिकेकर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहे. एवढ्या दिग्गज कलाकारांची लेक म्हणून स्वानंदीवर नक्कीच दबाव असेल असा अनेकांचा समज होतो. पण नुकत्याच एका मुलाखतीतून स्वानंदीने सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली आहेत. यावेळी तिने मी आई अन् बाबा तिघेही सोबत राहत नाही असाही खुलासा केला आहे.

'दिल से करीब' या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत स्वानंदी म्हणाली, 'आम्ही तिघंही खूप स्वतंत्र आहोत. पैशांच्या दृष्टीने किंवा इमोशनलीही आम्ही एकमेकांवर अवलंबून नसतो. बाबा मुंबईत वेगळीकडे राहतात मी वेगळीकडे राहते आणि आई तर पुण्यात असते. आम्ही ३ ४ दिवस कधी कधी बोलतही नाही. पण तिघांपैकी कोणीही एकमेकांना एक फोन जरी केला तरी आम्ही सगळं काम टाकून जिथे असून तिथून आम्ही तिघेही जण लोहचुंबकासारखे एकत्र येतो.'

ती पुढे म्हणाली, 'आई वडील नेहमीच कामात व्यस्त असायचे. त्यामुळे एकमेकांना भावनिदृष्ट्या साथ देणं कोणीच कधी केलं नाही. मी १ महिन्यांची असताना आई दिल्लीला जाऊन गाण्याचा कार्यक्रम करुन रात्रीच्या फ्लाईटने परत आली होती. त्यामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही वेगवेगळं ठेवायची शिकवण त्यांनी दिली.'

स्वानंदीला लहानपणापासूनच अभिनय आणि गायनाचा वारसा लाभला आहे. मात्र ती गाणं कधीच शिकली नाही. आज स्वानंदी अभिनेत्री म्हणूनच काम करते. नुकतीच ती सुकन्या मोने यांच्यासोबत 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई' या मालिकेत दिसली. यातील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात आलं.

टॅग्स :स्वानंदी टिकेकरउदय टिकेकर परिवारमराठी अभिनेता