स्वप्निल जोशीने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना त्याकाळी प्रचंड पसंतीस आली होती. पुढे त्याने ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात स्वप्निलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. या कार्यक्रमातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले. ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’ यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. त्याचा मोगरा फुलला हा चित्रपट जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबतच साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरू, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
स्वप्निल जोशी मराठी चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून कोणत्याही हिंदी मालिकेत झळकलेला नाहीये. पण त्याच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. तो लवकरच लेडीज स्पेशल मालिकेत दिसणार असून या मालिकेत तो एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची भूमिका या मालिकेत काय असणार याबाबत अद्याप तरी मालिकेच्या टीमकडून काहीही सांगण्यात आलेले नाहीये.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या 'लेडीज स्पेशल' या मालिकेत महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील तीन महिलांच्या आयुष्यात येणारे चढउतार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. लेडिज स्पेशल या मालिकेने आपल्या अद्भुत संकल्पनेने सर्व प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. या मालिकेचे कथानक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या तीन सक्षम आणि भिन्न व्यक्तिमत्व असणार्या महिलांच्या भोवती फिरते. गिरीजा ओक, बिजल जोशी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.