Join us

“पद्म पुरस्कार येत आहे”; स्वरा भास्करने साधला विक्रम गोखलेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 1:51 PM

Swara bhaskar: विक्रम गोखले यांनी कंगनाला पाठिंबा दिल्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करने विक्रम गोखलेंवर निशाणा साधला आहे.

भारताच्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं असं वक्तव्य कंगनाने एका मुलाखतीत केलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.मात्र, या सगळ्यात ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले (vikram gokhale) यांनी कंगनाची पाठराखण केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे विक्रम गोखले यांनी कंगनाला पाठिंबा दिल्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करने (swara bhaskar) विक्रम गोखलेंवर निशाणा साधला आहे.कंगनाच्या वक्तव्यामुळे सुरु झालेल्या वादामध्ये स्वरा भास्करने उडी घेतली आहे. तिने कंगनाऐवजी तिला पाठिंबा देणाऱ्या विक्रम गोखलेंवर टीकास्त्र डागलं आहे. स्वराने एक ट्विट करत शेलक्या शब्दांत विक्रम गोखलेंना सुनावलं आहे. स्वराने एएनआयचं एक ट्विट शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये विक्रम गोखले प्रसारमाध्यमांसमोर बसल्याचं दिसून येत आहे. सोबतच तिने  “पद्म पुरस्कार येत आहे” अशी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय आहे प्रकरण? 

८ नोव्हेंबरला कंगना रणौतला चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. “देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले,” असं कंगना यावेळी म्हणाली.

विक्रम गोखलेंनी केली कंगनाची पाठराखण

कंगनाने स्वातंत्र्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर एकीकडे तिच्यावर टीकास्त्र सुरु असतानाच विक्रम गोखलेंनी तिची पाठराखण केली. “हे स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. स्वातंत्र्य मिळावं यासाठी लढणारे योद्धे फासावर जात असताना अनेक मोठे लोक पाहत राहिले. ब्रिटीशांविरोधात उभे राहत असतानाही आपल्या लोकांना वाचवलं नाही, ” असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणतात,“भारत कधीही हिरवा होणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा देश भगवाच राहिला पाहिजे.” असं विधानही त्यांनी जाहीरपणे केले.  दरम्यान, विक्रम गोखले यांनी कंगनाला पाठिंबा दिल्यानंतर हा वाद चिघळल्याचं दिसून येत आहे. कंगनासोबतच आता अनेकांनी विक्रम गोखलेंवरही निशाणा साधला आहे. 

टॅग्स :स्वरा भास्करकंगना राणौतविक्रम गोखलेसेलिब्रिटी