Join us

देशाला नव्या पंतप्रधानांची गरज...! स्वरा भास्करचे ‘हे’ ट्विट पाहून नेटीजन्सची सटकली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 1:55 PM

Swara Bhaskar tweet : स्वराचे हे ट्विट लगेच व्हायरल झाले आणि नेहमीप्रमाणे काही लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्देसोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली स्वरा अनेक सामाजिक व राजकीय मुद्यांवर रोखटोक मत मांडताना दिसते. यावरून अनेकदा ती ट्रोलही होते.  

देशात कोरोनाचा जोर वाढतोय आणि दुसरीकडे ऑक्सिजन व बेड्सअभावी रूग्णांचे जीव जात आहेत. देशातील हे भीषण चित्र बघून अभिनेत्री स्वरा भास्करने  (Swara Bhaskar) मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. आता देशाला नव्या पंतप्रधानाची गरज आहे, असे थेटपणे तिने म्हटले. (Swara Bhaskar lashes out at Modi Government)

शेखर गुप्तांच्या एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना तिने हे मत व्यक्त केले. शेखर गुप्ता यांनी अलीकडे एक ट्विट केले होते. ‘देश चालत राहावा असे पीएमओ वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका नव्या टीमची गरज आहे,’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते. या ट्विटवर रिप्लाय करताना स्वराने थेट नव्या पंतप्रधानांचीच गरज व्यक्त केली.‘देशवासियांना आपल्या प्रियजनांना श्वासासाठी तडफडत बघायचे नसेल तर देशाला नव्या पंतप्रधानाची गरज आहे,’ असे ट्विट तिने केले.

झाली ट्रोल

स्वराचे हे ट्विट लगेच व्हायरल झाले आणि नेहमीप्रमाणे काही लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. माफ कर पण 2024 आधी असे काहीही होऊ शकत नाही, असे एका युजरने तिला सुनावले. अन्य एका युजरने ही स्वरा भास्कर आहे तरी कोण? असा प्रश्न विचारत तिची खिल्ली उडवली. अन्य एका युजरने तिला मोदींना सहन करण्याचा सल्ला दिला.

‘2024 पर्यंत सहन कर. त्यानंतर योगीजींना सहन करायचे आहे तुला. आम्ही तर खुश्श आहोत. बाकी तू तुझे पाहा,’ असे एका युजरने तिच्या या ट्विटवर कमेंट करताना लिहिले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दलही तू हे का लिहिले नाहीस? असा सवाल एका युजरने तिला केला.स्वरा भास्कर तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली स्वरा अनेक सामाजिक व राजकीय मुद्यांवर रोखटोक मत मांडताना दिसते. यावरून अनेकदा ती ट्रोलही होते.  

टॅग्स :स्वरा भास्करनरेंद्र मोदी