Swara Bhaskar Wedding: प्रत्येक मुद्यावर परखडपणे बोलणारी आणि यामुळे सतत ट्रोल होणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर मध्यंतरी तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. होय, हिमांशू शर्मासोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण कालांतराने दोघांच्या ब्रेकअपची चर्चाही ऐकायला मिळाली होती. अगदी काही दिवसांपूर्वी तिने एक सीक्रेट पोस्ट केली होती आणि पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण स्वरा कुणाच्या प्रेमात आहे, हे कळायला मार्ग नव्हता. पण काल स्वराने लग्नाची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. स्वराने 6 जानेवारी रोजी समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद याच्याशी कोर्ट मॅरेज केलं. लग्नानंतर जवळपास ४० दिवसांनी तिने या लग्नाचा खुलासा केला. पुढच्या महिन्यात स्वरा आणि फहाद रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत.
स्वरा आणि फहादची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. होय, एका आंदोलनात स्वरा व फहादची पहिली भेट झाली आणि मग दोघं प्रेमात पडले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये स्वराने तिची लव्ह-स्टोरी उलगडून सांगितली आहे.' कधीकधी तुम्ही ते संपूर्ण जगात शोधता, जे तुमच्या शेजारी असते. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री सापडली आणि नंतर आम्ही एकमेकांची जाणीव झाली. फहाद अहमद तुझे माझ्या आयुष्यात मनापासून स्वागत आहे...', असं कॅप्शन देत स्वराने पहिली भेट ते कोर्ट मॅरेज हा अख्खा प्रवास व्हिडीओतून सांगितला आहे.
अशी सुरू झाली लव्हस्टोरी...तर डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनात स्वरा व फहादची पहली भेट झाली. यानंतर जानेवारी २०२० मध्ये अशाच एका आंदोलनात दोघं पुन्हा भेटले. या दोघांचा पहिला सेल्फीसुद्धा आंदोलनातीलच आहे. त्यानंतर हळूहळू दोघांचा संपर्क वाढला. मार्च 2020 मध्ये फहादने स्वराला व्हॉट्स ॲप चॅटवर त्याच्या बहिणीच्या लग्नाचंही आमंत्रण दिलं होतं. मात्र शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती लग्नाला जाऊ शकली नव्हती. बहिणीच्या लग्नासाठी निमंत्रण देणारा मॅसेज फहादने केला. यावर, सॉरी, मित्रा नाही जमणार. पण वचन देते, तुझ्या लग्नात नक्की येईल, असा रिप्लाय स्वराने त्याला दिला.
पुढे गालिब नावाच्या मांजरीमुळे या दोघांमधील नातं बहरू लागलं. हळूहळू व्हिडीओ कॉलवर दोघं एकमेकांशी बोलू लागले. घट्ट मैत्री झाली आणि बघता बघता मैत्री प्रेमात बदलली. 6 जानेवारी रोजी दोघांनी कोर्ट मॅरेजसाठी कागदपत्रं जमा केली आणि दोघांचं कोर्ट मॅरेज झालं.
फहादचा जन्म 2 फेब्रुवारी 1992 रोजी झाला. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. 2018 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनं (TISS) केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विद्यार्थी संघटनेनं संप पुकारला होता आणि त्या संपात फहाद आघाडीवर होता. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. विद्यार्थी नेता म्हणून फहादची सुरुवात झाली आणि तो आता समाजवादी पक्षाची युवा शाखा असलेल्या समाजवादी युवजन सभेच्या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे.