शाहरूख खान (Shah Rukh Khan) व दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) ‘पठाण’ या सिनेमाने रिलीजआधीच वाद ओढवून घेतला आहे. ‘पठाण’चं ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) गाणं रिलीज झालं आणि देशातलं वातावरण तापलं. आता तर या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘पठाण’ला बायकॉट करण्याची मागणीही सुरू झाली आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर भाजपा व हिंदू संघटनांचा आक्षेप आहे. आत्तापर्यंत अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिनेही या वादावर आपलं मत मांडलं आहे. याआधीही स्वरा या वादावर बोलली होती.
सध्या तिचा विमानतळावरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत स्वरा ‘पठाण’ वादावर बोलली आहे. स्वरा विमानतळावर स्पॉट होताच पापाराझी तिला ‘पठाण’ वादावर प्रश्न विचारतात. यावर स्वरा म्हणते, आपल्या नेत्यांनी अभिनेत्रींचे कपडे पाहण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करावं, इतकंच मला वाटतं. तुम्ही आम्ही आपआपल्या कामावर लक्ष देत आहोत, तसं नेत्यांनीही त्यांच्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे.
स्वरा नेहमीच विविध मुद्द्यांवर बेधडकपणे बोलताना दिसते. अलीकडे स्वराने नादव लॅपिड याने ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केलं होतं. यावरूनही तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
सर्वप्रथम मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर आक्षेप घेतला होता. या गाण्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तेव्हापासून हा वाद चचेर्त आहे. सोशल मीडियावरही या वादावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.