राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला (Bharat Jodo Yatra) अनेक सेलिब्रिटींनी पाठींबा दिला. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. भारत जोडो यात्रेला 85 दिवस पूर्ण झाले आहेत आणि आज बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) या यात्रेत सामील झाली.
‘भारत जोडो’ यात्रा आज 1 डिसेंबर मध्यप्रदेशातील उज्जैन येथे पोहोचली. याठिकाणी स्वरा भास्कर या यात्रेत सहभागी झाली. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन स्वराचा ‘भारत जोडो’ यात्रेतील फोटो शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावरही या यात्रेतील स्वराचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
स्वराने काही दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला पाठींबा देत, त्यांच्या या प्रयत्नाचं कौतुक केलं होतं. यामुळे स्वराला ट्रोलही व्हावं लागलं होतं. आज स्वरा प्रत्यक्ष या यात्रेत सहभागी झाली.
काँग्रेसच्या ट्विटर हँडल शेअर करण्यात आलेल्या फोटोत स्वरा आणि राहुल गांधी दिसत आहेत. ‘आज प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर भारत जोडो यात्रेचा एक भाग बनली. समाजातील प्रत्येक वर्गाच्या उपस्थितीने या यात्रेला यशस्वी बनवलं आहे’, असं कॅप्शन देत हा फोटो पोस्ट करण्यात आला. मात्र याच कॅप्शनमुळे अनेकांनी स्वराला ट्रोल केलं. ही खरंच प्रसिद्ध आहे का? अशी उपरोधिक टिप्पणी एकाने केली. तर प्रसिद्ध की कुख्यात? अशा शब्दांत अन्य एकाने तिला ट्रोल केलं. ‘जिथे स्वरा भास्कर आहे, तिथे प्रसिद्धी होऊच शकत नाही’, अशीही टिप्पणी एका युजरने केली. काहींनी मात्र तिला पाठींबा देत तिचं कौतुक केलं.
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. अभिनेता सुशांत सिंग, अमोल पालेकर, रिया सेन, पूजा भट, रश्मी देसाई, आकांक्षा पुरी असे अनेक सेलिब्रिटी या यात्रेत दिसले. आता स्वरा भास्कर ही सुद्धा यात्रेत सहभागी झाली.
स्वराने गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, विरे दी वेडींग, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांत काम केलं आहे. स्वरा भास्कर तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा तिला यामुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.