सैफ अली खान, डिंपल कपाडिया, जीशान अय्यूब, सुनील ग्रोव्हर स्टारर ‘तांडव’ ही वेबसीरिज रिलीज झाली आणि नव्या वादाला तोंड फुटले. अनेक भाजपा नेते आणि संघटनांनी या वेबसीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवत, यावर बंदी घालण्याची मागणी केली. ठिकठिकाणी वेबसीरिजविरोधात निदर्शने झालीत, देशात वेगवेगळ्या भागात गुन्हेही नोंदवण्यात आले. वातावरण असे तापले असतानाच अभिनेत्री स्वरा भास्करने असे काही ट्विट केले की, नेटकरी तिच्यावर तुटून पडलेत. सध्या स्वरा जबरदस्त ट्रोल होतेय.
‘मी सुद्धा हिंदू आहे आणि मी तांडवच्या कोणत्याही दृश्यावर नाराज नाही. मग तांडव सीरिजवर बंदी का आणायला हवी?,’ असे ट्विट स्वराने केले.तिचे हे ट्वीट लगेच व्हायरल झाले आणि यानंतर अनेकांनी तिला या ट्वीटमुळे ट्रोल करणे सुरु केले.
‘ चित्रपटात काम करणा-यांचा कोणताही धर्म नसतो. पैसे मिळाल्यास ते काहीही करायला तयार होता. तुम्हा लोकांचा एकच धर्म आहे,तो म्हणजे पैसा, ’ असे एका युजरने लिहिले.
अनेकांनी स्वराला देशद्रोही म्हणत टीका केली. ‘बहेन, क्या पुरी जिंदगी गाली ही खायेगी,’ अशा शब्दांत एकाने स्वराची खिल्ली उडवली.
का होतोय विरोध? अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजला इतका विरोध का होतोय, हे अद्यापही अनेकांना माहित नाही. तर ‘तांडव’च्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता जीशान अय्यूब याला भगवान शिवाच्या गेटअपमध्ये प्ले करताना दाखवण्यात आले आहे. यादरम्यान तो अनेक आक्षेपार्ह विधान करतो. नेमक्या याला लोकांनी विरोध केला आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम यांनीही या सीरिजला जोरदार विरोध केला आहे. सीरिजमधील भगवान शंकराची थट्टा केलेला भाग हटवायला हवा. अभिनेता जिशान अयूब याला यासाठी माफी मागावी तसेच सीरिजच्या निमार्ता व दिग्दर्शकाने हात जोडून आणि गुडघे टेकून माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.