2020 साली बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) जगाला अलविदा म्हटलं. सुशांतच्या मृत्यूला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला पण अद्यापही त्याचे चाहते या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुशांत त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता. सुशांत डिप्रेशनमध्ये होता आणि यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक लोकांनी त्याच्या नावावर सवंग लोकप्रियता मिळवण्याचा, ते कॅश करण्याचा प्रयत्न केला होता. आत्ताही हा प्रकार सुरू आहे. सुशांतच्या चाहत्यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि ते भडकले. यानंतर सोशल मीडियावर फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मला बायकॉट करण्याची मागणी सुशांतच्या चाहत्यांनी लावून धरली. आता हे काय प्रकरण आहे, ते जाणून घेऊ यात. (Controversy Over t-shirt with Sushant Singh Rajputs Photo)
काय आहे प्रकरणतर फ्लिपकार्टवर विक्रीस असलेल्या टी-शर्टमुळे सुशांतचे चाहते भडकले आहेत. आता टी-शर्ट व सुशांतचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आहे. या टी-शर्टवर सुशांतचा फोटो छापलेला आहे. सगळ्यात शॉकिंग आहे ते यावर लिहिलेलं कोटशन. टी-शर्टवर सुशांतच्या फोटोसोबत Depression is like Drowing असं लिहिलेलं आहे. फ्लिपकार्टवर ही टी-शर्ट डिसकाऊंटवर विकली जात आहे.
ही टी-शर्ट पाहून सुशांतच्या चाहत्यांचा राग अनावर झाला. सोशल मीडियावर चाहत्यांनी आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली. सुशांतचं नाव डिप्रेशनची जोडलं गेलेलं पाहून चाहते संतापले. सुशांतला डिप्रेशनने नाही तर बॉलिवूड माफियांनी मारलं,असा दावा करत अनेक चाहत्यांनी संताप व्यक्त केला. एका युजरने तर याप्रकरणी फ्लिपकार्टला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशाराही दिला आहे.
14 जून 2020 रोजी सुशांतचं निधन झालं होतं. त्याच्या मृत्यूमागचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. अनेक तपास संस्था या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.