ICC T20 World Cup 2024 IND vs PAK : सध्या सगळीकडे टी २० वर्ल्डकपचा माहौल आहे. रविवारी(९ जून) रोजी टी २० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला अतिशय रोमांचक होता. संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या यंदाच्या टी २० वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात पैसा वसुल खेळ बघायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद ११९ धावा केल्या. मात्र भारतीय गोलंदाजांनी कमाल करत पाकिस्तानला केवळ ११३ धावांमध्ये रोखले. ६ धावांनी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.
पाकिस्तानच्या तोंडातला घास हिसकावून घेत मिळवलेल्या अभूतपूर्व विजयानंतर सगळ्याच स्तरातून भारताच्या क्रिकेट टीमचं कौतुक होत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात गोलंदाज जसप्रीत बुमराह चमकला. बुमराहने तिसऱ्या षटकांत भारताला मोहम्मद रिझवानची विकेट मिळवून दिली. त्यानंतर १५ व्या षटकात त्याने ३१ धावा करणाऱ्या मोहम्मद रिझवाची दांडी गुल केली. या सामन्यातील बुमराहने टाकलेली १९ वे षटक निर्णायक ठरले. ३ धावा अन् १ विकेट घेत जसप्रीतने त्याची स्पेल ४-०-१४-३ अशी संपवली. कालच्या सामन्याचा बादशहा ठरलेल्या बुमराहसाठी मराठी अभिनेता हृषिकेश जोशी यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
टी २० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचनंतर बुमराहचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. हृषिकेश जोशी यांनीही एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. "आता फक्त POK राहिलाय बुमराह..." असं म्हणत त्यांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. "बुमराह बाप आहे", अशी कमेंट एका चाहत्याने या पोस्टवर केली आहे. त्याच्या या कमेंटला हृषिकेष जोशी यांनी रिप्लाय केला आहे. "भारताचा आजवरचा बेस्ट पेस बॉलर आहेय...आसपास पण येत नाही कुणी", असं हृषिकेश यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कालच्या सामन्यामुळे भारतीचा गुणसंख्या ४ झाली आहे.सध्या ४ गुणांसह अमेरिका आणि भारत आघाडीवर आहेत. तर पाकिस्तानचा टी २० वर्ल्डकपमधील हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संकटात आले आहे. पाकिस्तानने उर्वरित दोन सामने जिंकून त्यांचे ४ गुण होतील, परंतु त्याचवेळी त्यांना अमेरिकेच्या उर्वरित दोन सामन्यांत पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. अशा वेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल.