ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमाचा मराठी ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अभिनेता अजय देवगणचा हा बहुचर्चित सिनेमा मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणतानाजी मालुसरेंची भूमिका साकारत असून अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल आणि उदयभानच्या भूमिकेत सैफअली खान आहे. तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा प्रेक्षकांना थ्रीडी मध्ये बघायला मिळणार आहे.
तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र होते. तसेच ते मराठा साम्राज्याचे वीर सुभेदार होते. स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत त्यांचा सहभाग होता. 4 फेब्रुवारी 1670 रोजी झालेल्या कोंढाण्याच्या लढाईसाठी ते ओळखले जातात.कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. तेव्हा आपल्या मुलाचं लग्न अर्धवट सोडून त्यांनी “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे” म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला”, या शब्दांत तानाजींच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले होते.
अजय देवगण अभिनित तान्हाजी - द अनसंग वॉरीयरची निर्मिती अजय देवगन याच्या एडीएफ आणि भूषण कुमारच्या टी-सिरीजने केली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने सांभाळली आहे. 10 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.