तापसी पन्नू ही व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पण अचानक ती मॉडेलिंगकडे वळली. यानंतर तिला अभिनयाचे क्षेत्र खुणावू लागले. तेलगू चित्रपटसृष्टीतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर ती बॉलिवूडकडे वळली. तिने चष्मे बद्दूर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. पिंक या चित्रपटामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले. तिने आजवर नाम शबाना, जुडवा 2, मुल्क, बदला यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
तापसीचा गेम ओव्हर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिने तिच्या आजवरच्या प्रवासाबाबत मुंबई मिररशी गप्पा मारल्या. याविषयी तापसी सांगते, मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत यश मिळवल्यानंतर बॉलिवूडकडे वळली. मी पैसा, नाव सगळे काही तिथे कमावले होते. त्यामुळे मला बॉलिवूडमधील पहिला चित्रपट मिळवायला स्ट्रगल करावा लागला नाही. माझा खरा स्ट्रगल हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुरू झाला. माझे करियर कशापद्धतीने मला करायचे हे माझ्या डोक्यात चांगलेच पक्के होते. त्यामुळे दाक्षिणात्य इंडस्ट्रीत देखील प्रवेश मिळवण्यासाठी मी काहीही स्ट्रगल केला नाही. खरे तर मला सगळ्यात जास्त स्ट्रगल हा मुंबईत आल्यानंतर घर शोधण्यासाठी करावा लागला.
तापसी ही मुळची दिल्लीची असून ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करताना काही वर्षं हैद्राबादमध्ये राहिली आहे. पण मुबंईत घर शोधण्याच्या अनुभवाविषयी ती सांगते, एकट्या राहाणाऱ्या अभिनेत्रीला कोणीच घर भाड्यावर द्यायला तयार नव्हते. आम्ही ज्या व्यवसायात आहोत, त्यावर लोकांचा बहुधा विश्वास नाहीये. आमच्यासाठी 500 रुपये खर्च करून लोक चित्रपट पाहायला येतात. पण त्याच लोकांना आम्हाला त्यांच्या सोसायटीत पाहायचे नाहीये. या गोष्टीचा मला सुरुवातीला खूप त्रास झाला. मला पाहिजे तसे घर मिळण्यासाठी कित्येक दिवस गेले.
तापसी पन्नूने आता मुंबईत नवीन घर घेतले असून या घरात ती तिच्या बहिणीसोबत राहाणार आहे.