तारक मेहता का उल्टा चष्मा ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शो वादातच अडकला आहे. पडद्यामागे बरंच काही घडत असून अनेक जुन्या कलाकारांनी मालिका सोडली आहे. शैलेश लोढा यांनी निर्मात्यांवर पैसे थकवल्याचे आरोप केल्यानंतर अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्मात्यांवर अश्लील भाषा वापरल्याचा आरोप केलाय. आता मालिकेतून 'बावरी' नावाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री मोनिका भदोरिया हिनेदेखील समोर येत निर्मात्यांची पोलखोल केली आहे.
काय म्हणाली 'बावरी' ?
तारक मेहता मालिकेसंबंधी वादात आता अभिनेत्री मोनिका भदोरियानेही उडी घेतली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "2019 मध्ये मी मालिका सोडल्यानंतर तीन महिने माझे ४ ते ५ लाख रुपये थकवले होते. असित मोदी यांनी प्रत्येक कलाकाराचे पैसे थकवले आहेत. मग राज उनाडकट असो किंवा गुरुचरण सिंह किंवा इतर लोक.खरं तर त्यांच्याजवळ पैशांची काहीच कमी नाही. पण टॉर्चर करण्यासाठी ते कलाकारांचे पैसे थकवत आहेत. "
तारक मेहतामध्ये काम करणं नरक होतं
मोनिकाने तारक मेहताचा अनुभव हा नरकासमान होता असंही म्हटलं आहे. मोनिकाच्या आईवर रुग्णालयात कॅन्सरचे उपचार सुरु होते. ती म्हणाली, "मी रात्रभर रुग्णालयातच असायचे आणि ते मला सकाळी लवकर शूटिंगसाठी बोलवायचे. वाईट गोष्ट ही की सेटवर आल्यानंतर माझा शॉटही नसायचा मी रिकामी बसलेले असायचे तरी मला लवकर बोलावलं जायचं. जेव्हा त्यांना माहित होतं की माझ्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरु आहेत."
आईच्या निधनानंतर सातव्याच दिवशी फोन आला
मोनिका म्हणाली, "आईचं निधन झाल्यानंतर असित मोदींनी मला धीर देण्यासाठी साधा फोनही केला नाही. उलट सातव्याच दिवशी फोन करुन मला सेटवर येण्यास सांगितलं. माझी मानसिक स्थिती ठीक नाही असं सांगूनही त्यांनी ऐकलं नाही.तुला कामाचे पैसे मिळतात, आम्ही बोलावू तेव्हा तू यायलाच हवं मग काहीह झालं असू दे असं त्यांनी मला सांगितलं. सोहेल रमानी तर सगळ्यांसोबत वाईट वागायचा. कुत्र्यासारखे वागवतात. त्याने तर नट्टू काकांचाही अपमान केला होता."