'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) मालिकेबाबत रोज नवनवीन खुलासे होतच आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या मालिकेच्या पडद्यामागे मात्र बरंच काही घडत आहे. अनेक कलाकारांनी निर्मात्यांवर आरोप करत मालिकाच सोडली. अभिनेत्री जेनिफरने तर निर्माते असित मोदींवर अश्लील कमेंट्स केल्याचा आरोप लावला. मालिकेतील लोकप्रिय पात्र बबिता अय्यरने सुद्धा अनेकदा मालिका सोडण्याचा प्रयत्न केला होता. तिलाही त्रास देण्यात आला होता असा खुलासा 'बावरी' हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका भदोरियाने केला आहे.
मालिकेत मोनिका भदोरियाने 'बावरी' हे पात्र साकारले होते जे खूपच लोकप्रिय झाले. मोनिकानेही निर्मांत्यांवर वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला होता. शिवाय तिने मूनमून दत्ता म्हणजेच बबिताजीला कशी वागणूक दिली गेली याचाही खुलासा केला. मोनिका म्हणाली, "मुनमुनने मालिका सोडली नसली तरी मला खात्री आहे तिलाही टॉर्चर केले असणार. म्हणूनच ती बराच काळ सेटवर आलीच नाही. ते मालिका सोडण्यासाठी प्रवृत्त करताता आणि नंतर पुन्हा सगळं ठीक करायचं सांगत बोलावून घेतात. मुनमुन दत्तासोबतही त्यांचे भांडण झाले आहे. कित्येकदा ती भांडणानंतर सेट सोडून जायची आणि कितीतरी दिवस परत यायचीच नाही."
मोनिका पुढे म्हणाली, "ते महिलांना एवढं महत्व देत नाहीत. जर कोणत्या अभिनेत्रीचं शूट संपलं असेल तर त्यानंतरही तिला थांबवून ठेवतात. पुरुषांचं शूट लवकर पूर्ण व्हावं याचा ते प्रयत्न करतात. पुरुषांनाच जास्त मानधन मिळतं. स्क्रीन स्पेस समान असला तरी त्या तुलनेत आम्हाला फार कमी मानधन मिळालं. सेटवर महिलांसोबत दुर्व्यवहार होतो."