‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेत दयाबेनची (Dayaben) गाजलेली भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) हिच्याबद्दल एक शॉकिंग बातमी सध्या ऐकायला मिळतेय. दिशा वकानीला घशाचा कॅन्सर झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं जात आहे. अर्थात दिशाकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘दयाबेन’ या व्यक्तिरेखेला दिलेल्या आवाजामुळे तिला घशाचा कर्करोग झाल्याचा दावा अनेक रिपोर्टमध्ये केला जात आहे. दिशा शोमध्ये विचित्र आवाजात बोलायची. याच आवाजात सलग 12-12 तास शूटींग करायची. अर्थात दिशा वा तिच्या कुटुंबीयांकडून या वृत्तावर कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही.
दिशा वकानी ‘दयाबेन’ या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचली. मात्र 2019 मध्ये प्रेग्नंसीमुळे तिने या मालिकेला रामराम ठोकला होता. दिशा वकानी शोमध्ये परतणार, अशी चर्चा अनेकवेळा झाली. पण अद्यापही ती शोमध्ये परतलेली नाही.अशात दिशाला घशाचा कर्करोग झाल्याची चर्चा पसरताच, तिचे चाहते चिंतीत आहेत. याचदरम्यान दिशाची एक जुनी मुलाखतही व्हायरल होतेय. दिशाने 2010 मध्ये ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ती तिच्या आवाजाबद्दल बोलली होती. ‘शोमध्ये माझा आवाज विचित्र आहे. या आवाजाची पातळी राखणं हे मोठं आव्हान आहे. अनेकदा मला हे करताना कठीण जातं. पण परमेश्वराच्या कृपेने मला याचा कधीही त्रास झाला नाही वा कधीही माझ्या आवाजाला कोणतीही हानी झालेली नाही. मी 12-12 तास शूटींग करते पण मला कधीही याचा त्रास झालेला नाही,’असं ती या मुलाखतीत म्हणाली होती.
जेठालाल म्हणाले, ही अफवादिशा वकानीला घशाचा कॅन्सर झाल्याचे वृत्त येताच चाहत्यांची चिंता वाढली. मात्र या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालाल अर्थात ही भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. ‘आज तक’शी बोलताना ते म्हणाले की, मला सकाळपासून सतत फोन येत आहेत. दरवेळी अशाच काही चित्रविचित्र बातम्या येतात. मला वाटतं, याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. या सगळ्या अफवा आहेत, असं मी म्हणले. याकडे दुर्लक्ष केलेलं बरं.‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. मला याबद्दल काहीही माहिती नाही. सोशल मीडियावर लाईक्स आणि क्लिक बिटसाठी अशा बातम्या पसरवल्या जातात. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे घशाचा कर्करोग होतो, आवाज काढल्यामुळे नाही. अशाने सगळेच मिमिक्री कलाकार घाबरून जातील, असं ते म्हणाले.
दिलीप जोशी यांच्या मते, दिशा वकानीला घशाचा कॅन्सर झाल्याचं वृत्त अफवा आहे. मात्र अद्याप खुद्द दिशाने याबद्दल कुठलंही भाष्य केलेलं नाही.