‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या टीव्हीवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta)सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवीन फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते. रविवारी तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आणि चाहते संतापले. इतके की, सोशल मीडियावर मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी सुरू झाली. ट्विटरवर ‘#ArrestMunmunDutta’ हा हॅशटॅगही व्हायरल झाला.प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच मुनमुनने माफी मागितली.
काय आहे प्रकरणरविवारी मुनमुनने एक व्हिडीओ शेअर केला आणि या व्हिडीओवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुनमुनने या व्हिडीओत एका जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. ‘मी युट्यूबवर येणार आहे आणि मला चांगले दिसायचे आहे. मला कुण्या ***** सारखे दिसायचे नाही,’ असे मुनमुन या व्हिडीओत म्हणताना दिसली़. तिचा हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि तो पाहताच लोकांनी तिला फैलावर घेतले.
मागितली माफी
प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच मुनमुनने माफी मागितली. मी काल पोस्ट केलेल्या व्हिडीओतील एका शब्दाचा चुकीचा अर्थ काढला गेला. कुणाचाही अपमान करण्याचा, त्यांना धमकावण्याचा, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. भाषेच्या अडचणीमुळे मी तो शब्द चुकीचा अर्थाने घेतला. पण माझी चूक लक्षात आणून देताच मी तो शब्द मागे घेतला. माझ्या मनात प्रत्येक जातीधर्माबद्दल समाजाबद्दल पूर्ण आदर आहे.अजानतेपणी झालेल्या या चुकीसाठी मी सर्वांची माफी मागते. मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करते, असे तिने तिच्या माफीनाम्यात लिहिले आहे.