‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. पण गेल्या काही दिवसांपासून या लोकप्रियतेला कदाचित ओहोटी लागली आहे. गेल्या काही महिल्यांत मालिकेतील अनेक लोकप्रिय कलाकारांनी या शोला रामराम ठोकला. दयाबेन कधीचीच गेली होती. ती गेली ती परत आलीच नाही. यानंतर तारक मेहता साकारणारे शैलेश लोढा, अंजली भाभी अर्थात नेहा मेहता, टप्पू साकारणारा राज अनादकत आदी कलाकारांनी मालिकेला टाटा बायबाय केला. इतकं कमी होतं की काय म्हणून गेल्या 14 वर्षापासून ही मालिका दिग्दर्शित करत असलेले दिग्दर्शक मालव राजदा हेही नुकतेच या मालिकेतून बाहेर पडले. साहजिकच यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बंद होणार का? या चर्चेला तोंड फुटलं आहे.
टीआरपी घसरला...?गेल्या काही दिवसांत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे अनेक मोठे कलाकार शो सोडून गेले. निर्मात्यांनी त्याजागी नवे चेहरे आणले खरे, पण चाहत्यांना हे नवे चेहरे पचनी पडले नाही. नव्या चेहऱ्यांसह शो पुढे रेटण्यात निर्मात्यांनी कुठलीही कसर सोडली नाही. पण कदाचित आता प्रेक्षकही तेच ते पाहून कंटाळले आहेत. गेल्या काही दिवसांत मालिकेचा टीआरपी घसरतो आहे. आधी हा शो टॉप 5मध्ये असायचा. पण मध्यंतरी हा टॉप टॉप 5 मधून हा शो बाहेर झाला होता. आता दिग्दर्शक मालव राजदा यांनी शो सोडल्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा टीआरपी आणखी कमी होऊ शकतो, असं मानलं जात आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बंद होणार?सोशल मीडियावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बंद होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. प्रेक्षक मालिकेतील तोच तोपणा पाहून कंटाळले आहेत. 10 पेक्षा अधिक स्टार्सनी शो सोडला आहे. टीआरपी घसरू लागला आहे. दिग्दर्शकानेही मालिकेला रामराम ठोकला आहे. त्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बंद होणार का? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. अर्थात तूर्तास तरी तारक मेहता का उल्टा चष्मा’ बंद होणार नाही, असंच मानलं जात आहे. ही मालिका इतकी सहज बंद होणारी नाही, या चर्चा पोकळ आहेत, असं अनेकांचं मत आहे. निर्मातेही मालिका सुरू ठेवण्याच्या इराद्यावर ठाम आहेत.