२००७ साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'तारे जमीन पर'मधील बालकलाकार ईशान तुम्हाला आठवत असेल ना. ईशानची भूमिका साकारणारा अभिनेता दर्शील सफारी आता २२ वर्षांचा झाला आहे.
'तारे जमीन पर' या चित्रपटाची कथा एका ईशान नावाच्या लहान मुलाच्या भावविश्वावर होती. या चित्रपटात दर्शीलसोबत आमीर खान मुख्य भूमिकेत होता. मात्र ईशानच्या भूमिकेतून दर्शीलने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते.
दर्शीलचे वडील मितेश सफरी यांनीही अभिनय क्षेत्रात काम केलं आहे. त्यांनी दूरदर्शन वरील 'चाणक्य' या मालिकेत बाल चाणक्याची भूमिका साकारली होती.
दर्शीलला २००८ साली सर्वात कमी वयात फिल्मफेरचा बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार देण्यात आला. 'तारे जमीं पर' नंतर दर्शीलनं 'बमबम बोले', 'जोकोमोन', 'मिडनाइट्स चिल्ड्रेन' या चित्रपटांमध्ये काम केलं
या व्यतिरिक्त दर्शीलनं काही मालिकांमध्येही काम केलं आहे. 'सुन यार ट्राय मार' आणि कलर्स टिव्हीचा डान्स रिअलिटी शो 'झलक दिखला जा' या टीव्ही शोमध्ये दिसला होता. तसेच तो काही जाहिरातींमध्येही झळकला आहे.
दर्शीलनं नुकतंच आपलं शिक्षण पूर्ण केलं असून सध्या तो नाटकाचे धडेही घेत आहे. याशिवाय तो नाटकात कामही करतोय. 'कॅन आय हेल्प यू' या नाटकात त्याने काम केलं आहे.