Kshitij Patwardhan : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन (Zhakir Husain)यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं आहे. झाकीर हुसेन यांना हृदयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्याने गेल्या आठवड्यातच सॅनफ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर अमेरिकेतील सॅनफ्रान्सिको येथील रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योती मावळली. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. झाकीर हुसेन यांच्या जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक क्षितीज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
क्षितीज पटवर्धनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलंय, "सूर पोरके होतात हे ऐकलं आज पहिल्यांदाच ताल अनाथ झाला असं वाटलं. अलविदा झाकीर हुसैन!" अशी भावनिक पोस्ट शेअर करत त्याने उस्ताद झाकिर हुसेन यांना आदरांजली वाहिली आहे.
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांचे वडील उस्ताद अल्ला रक्खा खाँ यांच्याकडेच त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून तबल्याचे धडे गिरवले. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केले.
संगीत क्षेत्रात रचले अनेक इतिहास
कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी एक 'सर्जनशील' साथीदार होते. याबरोबरच झाकीर यांनी जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वाद- कांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसेच एकलवादनही केले.
जॉन मॅकलॉप्लिन, एल. शंकर आणि टी. एच. विनयक्रम यांच्याबरोबर त्यांनी 'शक्त्ती बँड' स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला.