स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत लहानपणीच्या दृष्टीच्या (सना सय्यद) भूमिकेत राजस्थानातील बालकलाकार तमन्ना जैन ही भूमिका साकारीत आहे. तिसऱ्या इयत्तेत शिकणारी तमन्ना ही आठ वर्षांची असून चित्रीकरण आणि आपला अभ्यास यांचा समतोल तिने चांगल्या प्रकारे सांभाळला आहे.
या मालिकेत ही भूमिका मिळाल्याबद्दल तमन्ना म्हणाली, 'मी पाच वर्षांची असल्यापासूनच मला अभिनयाची आवड निर्माण झाली होती आणि मी यापूर्वी काही जाहिरातींमध्येही कामे केली आहेत. दिव्य दृष्टी मालिकेतील बालकलाकाराच्या भूमिकेची माहिती समजताच मी माझ्या ऑडिशन्सचा व्हिडिओ निर्मात्यांकडे पाठवून दिला होता आणि त्यावरून माझी तात्काळ निवडही झाली. स्टार प्लसवरील मालिकेत भूमिका रंगवायला मिळाल्याने माझे एक स्वप्न साकार झालं आहे. माझी जेव्हा गरज सते, तेव्हा मी राजस्थानहून मुंबईला येते आणि मला चित्रीकरण करताना खूप मजा येते.'ती पुढे म्हणाली, 'माझी शाळा मला खूपच सवलत देते आणि जेव्हा चित्रीकरण असते, तेव्हा मला शाळेत अनुपस्थित राहायची परवानगी देते. फक्त माझा अभ्यास बुडत नाही ना, याकडे त्यांचे लक्ष असते. सनादीदी ही मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी असून मला तिच्याबरोबर सेटवर राहायला आवडते.'वयाच्या आठव्या वर्षी आपली अभिनयाची आवड जोपासताना आपला अभ्यासही पूर्ण करणारी तमन्ना ही लक्षावधी मुलींसाठी एक आदर्श उदाहरणच ठरली आहे.