Join us

साऊथ सुपरस्टार थालापथी विजयनं स्वत:च्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:36 PM

अभिनेता विजय याने राजकारणात यावं अशी त्याच्या वडिलांची म्हणजे एस ए चंद्रशेखर यांची इच्छा होती.

साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता थालापथी विजय यानं वडील एस. ए चंद्रशेखर आणि आई शोभा यांच्यासह ११ जणांविरोधात कोर्टात खटला दाखल केला आहे. नागरी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत अभिनेता विजयने कोणत्याही लोकांना एकत्र जमवण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारची मिटींग घेण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जाऊ नये अशी मागणी केली आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेता विजय याने राजकारणात यावं अशी त्याच्या वडिलांची म्हणजे एस ए चंद्रशेखर यांची इच्छा होती. त्यासाठी विजयचे वडील चंद्रशेखर यांनी विजय याच्या नावाचा पक्ष रजिस्टर करण्यासाठी पाऊल टाकलं. विजय यांच्या वडिलांनी घोषित केले की, पद्मनाभन पार्टीचे अध्यक्ष आमचे नातेवाईक असतील. शोभा खजिनदार आणि स्वत: विजय यांचे वडील पक्षाचे जनरल सेक्रेटरी राहतील.

आता अभिनेता विजयनं जाहीरपणे निवेदन जारी करत म्हटलंय की, असा कुठलाही पक्ष स्थापन करण्यासाठी माझी सहमती घेण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याने आईवडिलांसोबत ११ जणांविरोधात कोर्टात दावा दाखल केला आहे. जेणेकरून लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि माझ्या नावाचा वापर करून मिटींग करण्यावर बंदी आणावी अशी मागणी विजय याने कोर्टात केली आहे. यापूर्वी विजय त्याच्या लग्झरी कारच्या टॅक्सच्या बातमीवरुन चर्चेत आले होते.

विजय यांच्यावर आरोप होता की, त्याने मागवलेली कार लंडनहून आणली होती आणि त्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स दिला नाही. विजयने २०१३ मध्ये रॉल्स रॉयल कार मागवली होती. मद्रास हायकोर्टाने अभिनेता विजयवर १ लाखाचा दंड आकारला होता. थालापथी विजय हा दाक्षिणात्य सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनयाच्या जोरावर विजय नेहमी ब्लॉकबस्टर सिनेमा प्रदर्शित करतात. ते मास्टर विजय, सरकार, थेरी, मार्सल, Thuppakki, Bigil, Velayudhan, Puli, थिरुमलाई अशा विविध सिनेमात काम केले आहे. अलीकडेच मास्टर विजय सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातील गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं होतं.

टॅग्स :सिनेमान्यायालय