सलमान खान आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला भारत हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांनी खूप चांगला अभिनय केला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तसेच या चित्रपटातील सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. सलमानच्या या चित्रपटाला खूप चांगले ओपनिंग मिळाले असून त्याबाबत त्याने आपल्या फॅन्सचे ट्वीटरद्वारे आभार देखील मानले आहेत.
पण आता सलमानच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. भारत प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि सलमानला चांगलाच धक्का बसला आहे. कारण इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सलमानचा भारत हा चित्रपट दुसऱ्याच दिवशी ऑनलाईक लीक झाला आहे. तामीळ रॉकर्सने हा चित्रपट लीक केला असून या गोष्टीमुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
भारत या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहाता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगला कमाई करेल असा अंदाज लावला जात होता.
तामीळ रॉकर्स या वेबसाईटने आतापर्यंत अनेक चित्रपट हॅक केले असून त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत. सलमान खानने देखील अनेक मुलाखतींमध्ये चित्रपट लीक होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘भारत’ने पहिल्या दिवशी ४२.३० कोटींचा गल्ला जमवला. याचसोबत ‘भारत’ हा सलमनाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. २०१० मध्ये सलमानचा ‘दबंग’ रिलीज झाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १४.५० कोटींची कमाई केली होती. २०११ मध्ये ‘बॉडीगार्ड’ने पहिल्या दिवशी २१. ६० कोटी कमावले होते. २०१२ मध्ये ‘एक था टायगर’ने ३२.९३ कोटी, ‘किक’ने २६.४०, २०१५ मध्ये ‘बजरंगी भाईजान’ने २७.२५ कोटी, २०१६ मध्ये ‘सुल्तान’ने ३६.५४ कोटी, २०१७ मध्ये ‘ट्युबलाईट’ने २१.१५ आणि २०१८ मध्ये ‘रेस 3’ने २९.१७ कोटींची कमाई केली होती. ‘भारत’ने या सगळ्या चित्रपटांचा रेकॉर्ड तोडत पहिल्याच दिवशी ४२.३० कोटींचा बिझनेस केला आहे.