सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या तांडव या वेबसिरिजची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा रंगली आहे. या वेबसिरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून ही वेबसिरिज कधी प्रदर्शित होत आहे याची उत्सुकता लोकांना लागलेली होती. ही वेबसिरिज आता प्रदर्शित झाली असून या वेबसिरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
तांडव या वेबसरिजची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ही वेबसिरिज काहींना आवडत आहे तर काहींच्या मते या वेबसिरिजद्वारे हिंदुच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही वेबसिरिज चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसिरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी लावला आहे. या वेबसिरिजमधील एका दृश्यामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले जात आहे. या वेबसिरिजच्या एका दृश्यात मोहम्मद जीशान अयूब भगवान शंकराच्या भूमिकेत दिसत आहे. एका नाटकात तो ही भूमिका साकारताना दिसत आहे. पण नाटक सुरू असताना रंगमंचावर एक व्यक्ती येऊन त्यांच्याशी बोलायला लागते असे दाखवण्यात आले आहे. त्यांचे हे संभाषण जेएनयूशी संबंधित आहे. पण हा संवाद सुरू असतानाच भगवान शंकराच्या वेशात असणारा मोहम्मद जीशान अयूब शिवी देताना दिसत आहे. या दृश्यामुळे हिंदू संघटनांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ही क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून या दृश्यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
तांडवच्या निर्मात्यांनी लोकांची भावना दुखावल्याबद्दल त्यांची माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियाद्वारे केली जात आहे. ही वेबसिरिज अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केली आहे. अली अब्बास जाफरनेच हिमांशू किशन मेहरा यांच्यासोबत या वेबसिरिजची निर्मिती केली आहे. तांडव ही वेबसिरिज एक पॉलिटिकल ड्रामा आहे.