सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेली तांडव ही वेबसिरिज गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेली आहे. या वेबसिरिजला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’वर हिंदू देवी-देवतांचा अपमान आणि जातिगत भावना भडकवल्याच्या आरोप झाला होता. ही वेबसीरीज बॅन करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर करण्यात आली होती. तसेच या सीरिजविरोधात देशभरात विविध ठिकाणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. लोकांचा हा रोष पाहाता निर्मात्यांनी लोकांची माफी मागितली होती. तसेच वेबसिरिजमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील असे मान्य केले होते. पण असे असूनही हा वाद काही थांबत नाहीये. आता तर करणी सेनेने या वादात उडी मारली आहे.
महाराष्ट्र करणी सेनेने तांडव या वेबसिरिजच्या बाबतीत एक वेगळेच पाऊल उचलले आहे. या वेबसिरिजमधील कलाकार तसेच दिग्दर्शकाची जीभ छाटून आणणाऱ्या व्यक्तीला आता त्यांनी एक कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी म्हटलं की हिंदू देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही आणि जो कोणी 'तांडव' मध्ये काम केलेल्यांची जीभ छाटून आणेल त्याला बक्षिस दिलं जाईल.
‘तांडव’च्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता जीशान अय्यूब याला भगवान शिवाच्या गेटअपमध्ये नाटक करताना दाखवण्यात आले आहे. यादरम्यान तो अनेक आक्षेपार्ह विधान करतो. नेमक्या याला लोकांनी विरोध केला होता. महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम यांनीही या सीरिजला जोरदार विरोध केला होता. सीरिजमधील भगवान शंकराची थट्टा केलेला भाग हटवायला हवा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच अभिनेता जिशान अयूब याला यासाठी माफी मागावी तसेच सीरिजच्या निमार्ता व दिग्दर्शकाने हात जोडून आणि गुडघे टेकून माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली होती.
तांडव वेबसिरिजमध्ये सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत तर ही वेबसिरिज अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केली आहे. अली अब्बास जाफरनेच हिमांशू किशन मेहरा यांच्यासोबत या वेबसिरिजची निर्मिती केली आहे. तांडव ही वेबसिरिज एक पॉलिटिकल ड्रामा आहे.