‘मीटू’ला (Me-Too Movement) वाचा फोडणारी बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta ) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दीर्घकाळापासून बॉलिवूड व हेडलाईन्समधून गायब असलेल्या तनुश्रीने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत, खळबळजनक आरोप केले आहेत. बॉलिवूडमधील माफिया, काही राजकीय व्यक्ती आणि देशद्रोही लोकांकडून मला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला आहे. अतिशय वाईट पद्धतीने माझा छळ केला जात आहे, मला लक्ष्य केल्या जात आहे. कृपया कुणी काहीतरी करा, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तनुश्रीची पोस्टतनुश्रीने नुकतीच इन्स्टाग्राम एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती लिहिते, ‘गेल्या काही दिवसांपासून माझा छळ केला जात आहे. तसेच मला अतिशय वाईट पद्धतीने लक्ष्यही केले जात आहे. कृपया कोणीतरी काहीतरी करा. गेल्या वर्षभरात माझे बॉलिवूडमधील प्रोजेक्ट नष्ट करण्यात आले. त्यानंतर कट रचून एक मेड प्लांट करण्यात आली. तिने माझ्या पाण्यात काही औषध आणि स्टेरॉईड्स मिसळले. ज्यामुळे मला गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागले. यानंतर मी मे महिन्यात उज्जैनला असताना माझ्या गाडीच्या ब्रेकसोबत दोनदा छेडछाड करण्यात आली आणि त्यामुळे माझा अपघात झाला. मी मरणाच्या दारातून परत आले. तब्बल 40 दिवसांनी मी मुंबईत परत आली, जेणेकरुन मला सर्वसामान्य जीवन आणि काम सुरु करता येईल. पण त्यानंतर आता माझ्या इमारतीतील रुमच्या बाहेर विचित्र गोष्टी पाहायला मिळाल्या. मी सांगू इच्छिते की, निश्चितपणे या सगळ्या गोष्टींना घाबरुन मी आत्महत्या करणार नाही. हे सर्वांनी कान उघडे ठेवून ऐकावं. मी सोडणार नाही आणि पळपुटेपणाही करणार नाही. मी इथे राहण्यासाठी आणि माझ्या करिअरला पूवीर्पेक्षा अधिक उंचीवर नेण्यासाठी इथे आहे. बॉलिवूडमधील माफिया, महाराष्ट्रातील जुने राजकीय वर्तुळ ( ज्यांचा अजूनही प्रभाव आहे) आणि देशद्रोही लोक लोकांना त्रास देण्यासाठी असे प्रकार करतात याची मला जाणीव आहे. पण मला निश्चितच खात्री आहे की या सर्व गोष्टींच्या मागे मीटू मोहिमेचे आरोपी आणि मी पर्दाफाश केलेल्या एनजीओ आहेत. कारण त्याच्याशिवाय इतर कोणी माझा असा छळ का करेल? तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट किंवा लष्करी राजवट लागू करावी आणि केंद्राचं यावर पूर्ण नियंत्रण असावं, असंही तनुश्रीने म्हटलं आहे. महाराष्ट्रात गोष्टी हाताबाहेर जात आहेत. माझ्यासारख्या लोकांना त्रास होत आहे. पण मी आता अधिक सखोल आध्यात्मिक साधना करून स्वत:ला आत्मा मजबूत करणार आहे. मी माझ्या नवीन कामावर संधींवर लक्ष केंद्रीत करणार आहे. अर्थात मला तुमच्या मदतीची फार गरज आहे,असं तनुश्रीने म्हटलं आहे.
2008 साली तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप करून तिने खळबळ उडवली होती. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं. नाना पाटेकर यांच्यामुळे माझं फिल्मी करिअर संपलं असेही तिने म्हटलं होतं.