तनुश्री दत्ताने केलेले आरोप नाकारल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नाना पाटेकर यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी याबाबत मीडियाला सांगितले आहे. तनुश्री दत्ताने लावलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याने तिने माफी मागावी असे नोटीसमध्ये नमूद केले असल्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली. पण तनुश्रीला अद्याप कोणतीही नोटिस मिळाली नसल्याचे तिने मीडियाशी बोलताना सांगितले आहे.
तनुश्रीने मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, मला अद्याप कोणतीही नोटिस मिळालेली नाहीये. नोटिस पाठवत आहोत अशी धमकी दिल्याने माझ्यासारखे लोक पुढे येऊन बोलायला घाबरतील असे त्यांना वाटत असेल. माझ्यासारखा अनुभव कोणाला आयुष्यात आला असेल तर त्यांनी पुढे येऊन नक्कीच तक्रार दाखल करावी. या लढ्यात देशभरातील लोक माझ्या पाठिशी उभे राहातील याचा मला विश्वास आहे. मीडियाने मला जो पाठिंबा दिला आहे, त्याबाबत मी त्यांची आभारी आहे. समाज अनेकवेळा अशाप्रकारच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण आता या सगळ्याला उत्तर देण्याची योग्य वेळ आली आहे.
२००८ साली ‘हॉर्न ओक प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले होते आणि मनसेकडून धमकावले होते, असा तनुश्रीचा आरोप आहे. या सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. कोरियोग्राफरला दूर सारत डान्स स्टेप्स कशा कराव्यात दाखवण्याचा अट्टाहास नाना करत होते अशी आठवण तिने सांगितली आहे. एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने या गोष्टी सांगितल्या आहेत. कॉन्ट्रॅक्टनुसार ते गाणं सोलो होतं मात्र नाना पाटेकरांना आपल्यासोबत इंटिमेट सीन करायचा होता असा गंभीर आरोपही तिने केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे ते गाणं न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. हा प्रकार आठवला की आजही दचकते असंही तिने म्हटले आहे.
मात्र नाना पाटेकर यांनी तिचे सगळे आरोप खोडून काढले होते. सेटवर १००-२०० लोक हजर होते. या सर्वांसमोर मी तिच्यासोबत गैरवर्तन केले, असे ती का म्हणतेय, मला ठाऊक नाही़ शेवटी कुणी काय बोलावं, हे मी कसे ठरवणार. मी फक्त एवढेच सांगेल की, कुणी काहीही म्हणो, मला माझ्या आयुष्यात जे करायचे तेच मी करणार, असे नाना पाटेकर मिरर नाऊ सोबत बोलताना म्हणाले होते.