तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेवर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. 2008 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप तनुश्रीने केला आहे. या मुद्द्यावर सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा)चे अध्यक्ष विक्रम गोखले यांनी चुप्पी साधली आहे. ते म्हणाले की, आमचा कोणालाही पाठिंबा नसून तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादावर आम्ही आता काहीही बोलणार नाही.
मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. यात नाना पाटेकर, साजिद खान, विकास बहल, सुभाष घई व आलोकनाथ या कलाकारांची नावे समोर आली आहेत. सिनेजगतातील कलाकारांवर आरोप लागल्यानंतर सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन म्हणजेच सिंटाने पीडित महिलांना पाठिंबा दिला आहे. तसेच सिंटाने आरोप केलेल्या व्यक्तींना नोटीस पाठवून उत्तर मागवले होते. या मुद्द्याला घेऊन सिंटाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विक्रम गोखले यांनी आपले मत मांडताना सांगितले की, चाळीस वर्षांपासून मी सिंटाचा सदस्य आहे. सिंटा खूप चांगले काम करत आहे आणि सध्या मीटू मोहिमेअंतर्गत जे काही समोर येत आहे, असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. सिंटा ही फक्त संघटना नसून हे सगळे कलाकार आमचेच आहेत. आम्ही कोणताही भेदभाव करत नाही. सगळे कलाकार आमच्यासाठी समान आहेत. आता तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादावर आता काहीही बोलणार नाही. या प्रकरणाचा आम्ही अभ्यास करीत आहोत. न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आता यावर बोलणे उचित ठरणार नाही.