मोगुल या चित्रपटाचा दिग्दर्शक सुभाष कपूरचे नाव मीटू प्रकरणात आल्यानंतर आमिर खानने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने हा चित्रपट सोडला असल्याचे त्याने काही महिन्यांपूर्वी ट्वीट करून सांगितले होते. पण आता आमिरने त्याचा निर्णय बदलला असून मोगुल या चित्रपटात तो काम करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. मोगुल हा चित्रपट गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला असून यात आमिर खान गुलशन कुमार यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आमिरच्या या निर्णयावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आमिरने घेतलेल्या या निर्णयावर आता तनुश्री दत्ता चांगलीच भडकली आहे.
आमिरने त्याचा हा निर्णय मागे घेण्यामागचे कारण देखील दिले होते. त्याने म्हटले होते की, कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणतीही व्यक्ती ही निर्दोषच असते. जोपर्यंत त्यांच्यावर कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने घरीच बसायचे का? त्यांनी कमावणेच बंद करायचे का? असे अनेक प्रश्न मला पडले होते. माझ्या एका निर्णयामुळे एका व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून मी माझा निर्णय बदलला आहे.
आमिरच्या या निर्णयावर तनुश्री दत्ताने म्हटले आहे की, बॉलिवूडमध्ये महिलेचे शोषण होत असल्याने ती महिला काम करू शकत नव्हती. त्यावेळी हे लोक आरामात कसे काय झोपत होते? ते सुभाष कपूरना काम देऊ शकतात तर ते गीतिकाला का काम देऊ शकत नाही? 2009 मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी माझ्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मी माझे घर चालवण्यासाठी काय करत आहे हे कधीही मला कोणीही विचारले नाही. आमिर माझ्यावर तू त्यावेळी उपकार का केले नाहीस?
सुभाष कपूरवर गीतिका त्यागीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तिने आमिरच्या या निर्णयाबाबत मीड डे शी बोलताना सांगितले आहे की, किरण राव आणि आमिर खानने या चित्रपटाचा भाग व्हायचे नाही हा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाचे मी स्वागत केले होते. यामुळे अनेक महिलांना समोर येऊन आपल्यासोबत घडलेली गोष्ट बोलण्याची ताकद मिळाली होती. पण आता सुभाष कपूरसोबत आमिर काम करणार आहे. खरे तर दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून आमिरने निर्णय घेतला असता तर ते खूपच चांगले झाले असते.