'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला रोशन सिंग सोढी अर्थात गुरुचरण सिंग गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होता. गुरुचरणची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. गुरुचरणवर भलंमोठं कर्ज असल्याचाही उलगडा झाला. अशातच गुरुचरणी मैत्रीण भक्ती सोनीने त्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक खुलासा केला. तो जवळपास मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे पण कोणीही त्याची मदत करायला पुढे येत नाहीये, असं भक्ती म्हणाली.
भक्तीने गुरुचरणला केली ३३ लाखांची मदत
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत भक्तीने सांगितलं की, "मी गुरुचरणला १३ लाखांची एक ब्रँड दिली आहे. त्या ब्रँडच्या शूटिंगसाठी तो या महिनाअखेरीस मुंबईला येईल. मी आनंदी आहे गुरुचरण पुन्हा काम करण्यास उत्साह दाखवतोय. मी त्याला ३३ लाख रुपये दिले आहेत. तो मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे पण कोणीही त्याची मदत करायला पुढे का येत नाहीये, हेच मला कळत नाहीये.
भक्ती पुढे म्हणाली, "तारक मेहताच्या टीमकडून सोढीला कॉल आला आणि त्यांनी त्याच्या तब्येतीची चौकशी केली. परंतु कोणीच आर्थिक मदतीसाठी पुढे आलं नाही. गुरुचरणला पैशांची गरज आहे का, असं कोणी विचारलं नाही. एका अभिनेत्याला पैसे नाही तर कामाची गरज असते. गुरुचरणलाही सध्या कामाची नितांत गरज आहे. आणि मी त्याला काम देण्यात यशस्वी झाली याचा आनंद आहे." दरम्यान काही महिन्यांपूर्वी गुरुचरण बेपत्ता झाला होता. नंतर तो पुन्हा घरी परतला. कर्जाचा डोंगर, त्यात काम नाही, खालावलेली तब्येत अशा अनेक गोष्टींमुळे गुरुचरणची सर्वांना काळजी वाटत आहे.