'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांनी साखरपुडा केल्याची बातमी समोर आली होती. ९ वर्षांनी छोट्या असलेल्या राजबरोबर मुनमुनने साखरपुडा केल्याने सगळेच आश्चर्यचकित झाले होते. पण, नंतर हे वृत्त खोटं असल्याचं समोर आलं होतं. राज अनादकटने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी पूर्णपणे खोटी आणि अर्थहीन असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता मुनमुनने तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर केली आहे.
टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिकेतून मुनमुन दत्ता घराघरात पोहोचली. 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेत बबिता हे पात्र साकारून मुनमुन प्रसिद्धीझोतात आली. याच मालिकेत टप्पूचं पात्र साकारणाऱ्या राजबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. तेव्हादेखील मुनमुनने या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं होतं. आता राजबरोबरच्या साखरपुड्याच्या खोट्या बातमीनंतर तिने पोस्ट शेअर केली आहे. मुनमुन सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
मुनमुनने तिच्या इन्स्टाग्रामवरुन न्यूयॉर्क व्हॅकेशन ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने शर्ट आणि पँट परिधान करत बॉस लेडीसारख्या पोझ दिल्याचं पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत मुनमुन म्हणते, "मी माझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत आहे. न्यूयॉर्क ट्रीपमधील माझे काही फोटो शेअर करत आहे." तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
राज अनादकटबरोबर साखरपुडा केल्याच्या चर्चांवर मुनमुनने प्रतिक्रिया दिली होती. "या गोष्टींवर मी माझी शक्ती वाया घालवणार नाही," असं मुनमुन म्हणाली होती. मुनमुनने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे.