तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठालाल, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे. या मालिकेतील जेठालाल तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या मालिकेत ही व्यक्तिरेखा दिलीप जोशी साकारत आहे.
दिलीप जोशीने या मालिकेच्याआधी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली. मैंने प्यार किया, हम आपके है कौन यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आपल्याला दिलीप जोशीला पाहायला मिळाले होते. तसेच ये दुनिया है रंगीन, हम सब एक है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.
दिलीप जोशीने मैंने प्यार किया या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तो नोकराच्या भूमिकेत दिसला होता. तसेच कभी ये कभी वो या मालिकेद्वारे त्याने छोट्या पडद्यावर एंट्री घेतली. दिलीप गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. आज छोट्या पडद्यावरील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. दिलीप जोशी छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यापैकी एक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, दिलीप जोशीने एक साहाय्यक अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याला सुरुवातीला केवळ ५० रुपये इतकेच मानधन मिळाले होते. पण आज तो एका दिवसाचे लाखो रुपये घेतो.