जानेवारी महिना उजाडला की महिलावर्गाला वेध लागतात ते मकरसंक्रांतीचे. मग संक्रांतीचं हळदीकुंकू करणे, तिळगुळाचे लाडू करणे, लहान मुलांचं बोरन्हाणं करणे असं बरंच काही स्त्रिया करतात. विशेष म्हणजे यात लग्न झालेल्या नव्या जोडप्याचं पहिली मकरसंक्रांत असेल तर विचारायची सोयच नाही. त्यामुळे या सणाशी निगडीत प्रत्येकाकडेच अनेक आठवणी, किस्से असतात. यात सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. नुकतंच मराठी कलाविश्वातील लाडक्या बहिणींची जोडी खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे (khushboo and titeeksha tawde) यांनी यंदा त्या मकरसंक्रांत कशी साजरी करणार हे सांगितलं आहे.
“खूप खास आहे ही मकरसंक्रांत आमच्यासाठी कारण नवीन घरात पहिला सण आणि वर्षाचा ही पहिला सण आहे. नवीन घरात मार्गशीर्षातल्या गुरुवारी स्थलांतर केले. हंगाम बदलतो त्यासोबत खाण्या-पिण्याच्या सवयी ही बदलतात. तीळ आणि गुळाचा खाण्यात समावेश होतो. या काळात मी काळे कपडे परिधान करते जसे मकरसंक्रांतीच्या दिवशी सगळे काळे कपडे घालतात कारण त्याने उब मिळते. हळदी-कुंकू माझ्या सासरी म्हणजे सायनला होतं, एकदम पारंपरिक पद्धतींनी साजरा केली जाते मकरसंक्रांत. माझा मुलगा राघव थोडं बोलायला लागला आहे तर त्याच्या तोंडातून तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे ऐकण्याचं कुतहूल आहे मला,” असं खुशबूने सांगितलं.
खुशबूप्रमाणेच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडे हिने सुद्धा तिचा मकरसंक्रांतीचा प्लॅन सांगितला आहे. "मकरसंक्रांत मी कुटुंबासोबत साजरी करते. माझी लहानपणाची आठवण आहे जेव्हा मी, खुशबू, आई आणि बाबा आम्ही एकत्र बसून तिळगुळाचे लाडू बनवायचो. मला लक्षात आहे मला ते नीट बनवायला जमायचे नाही आणि सारण गरम असल्यामुळे ते लाडू माझ्या हातात फुटायचे. गेले काही वर्षापासून मी उत्तम तीळ गुळाचे लाडू बनवते. आई- बाबा दुकान बंद करून उशिरा रात्री परत यायचे पण एकत्र बसून लाडू बनवायचा कार्यक्रम दरवर्षीचा ठरलेला होता. मला तिळगुळाचे लाडू प्रचंड आवडतात मी एका खेपेत डब्बा भरून लाडू संपवायचे. या थंडीच्या ऋतूत तिळाच्या लाडवाचे फायदे ही आहे ते आपल्या शरीराला उब देतात. या वर्षी सुद्धा आई-बाबां सोबत सण साजरा करायचा हाच बेत आहे. मी कधी पतंग उडवले नाही पण खुशबू जेव्हा गुजरातला शिकत होती तेव्हा तिने पतंग उडवले आहेत आणि पतंग उडवण्यामागचं ही कारण आहे की तुमच्या शरीराला सूर्याची उष्णता मिळाली पाहिजे."