चार वर्षांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांनी सुरू केलेल्या तेजाज्ञा या डिझाइनर ब्रॅंडला आता चार वर्षं पूर्ण होत आहेत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या डिझाइनर ब्रॅन्डला आपली कधी जाहिरात करायची गरज पडली नाही... पण ‘वुमन्स डे’चे औचित्य साधून तेजाज्ञा ब्रॅन्ड आपली पहिली अॅड फिल्म घेऊन आली आहे.
तेजस्विनी पंडित या अॅड फिल्मविषयी सांगते, “तेजाज्ञा ब्रँड आपल्या वेगवेगळ्या डिझाइनर आऊटफिट्स आणि साड्यांद्वारे वुमनहुडला नेहमीच सेलिब्रेट करतो. पण स्त्रीत्वाला वुमन्स डेच्या निमित्ताने आम्ही ह्या नव्या अॅड फिल्मद्वारे ट्रिब्युट दिलंय. महिला दिनी स्त्रीच्या सशक्तीकरणाचे संदेश देणारे व्हिडीयो करण्यापेक्षा आम्ही स्त्रीत्वाला आमच्या आगळ्या कलात्मक पद्धतीने दिलेली ही आदरांजली आहे.”
तेजाज्ञाच्या या व्हिडीयोमध्ये सहा वर्षांच्या लहान मुलीपासून साठ वर्षांच्या वयोगटातल्या स्त्रियांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि क्षेत्रातल्या स्त्रिया दाखवल्या आहेत. तेजस्विनी पंडित याविषयी सांगते, “सेवानिवृत्त शिक्षिका ते गृहिणी, डॉक्टर, पोलिस, डिझाइनर, नृत्यांगना आणि शाळेत जाणारी चिमुकली चित्रकार अशा वेगवेगळ्या आवडी जोपासणाऱ्या वेगवगेळ्या माध्यमांमधल्या स्त्रियांना आम्ही ही मानवंदना दिली आहे.”
या व्हिडीयोमध्ये तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावेसोबतच हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे, स्नेहलता तावडे, सुखदा खांडेकर, सुहासिनी देशपांडे, गार्गी जोशी आणि ज्योती चांदेकर या अभिनेत्री देखील दिसून येत आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पहिल्यांदाच तिच्या आई ज्योती चांदेकरसोबत एका अॅड फिल्ममध्ये काम केले आहे.
तेजस्विनी पंडित ही आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून तिने मी सिंधुताई सकपाळ, तू ही रे, ये रे ये रे पैसा यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच १०० डेज, तुझे नि माझे घर श्रीमंताचे यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली आहे. तिच्याप्रमाणेच अभिज्ञा देखील अभिनेत्री असून खुलता कळी खुलेना, कट्टी बट्टी या मालिकांमध्ये ती झळकली आहे. सध्या तुला पाहाते रे या प्रसिद्ध मालिकेत ती मायरा ही भूमिका साकारत आहे.