तेजस्विनी पंडितचा आज म्हणजेच २३ मे ला वाढदिवस असून तिचा जन्म पुण्यातील आहे. तिची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने गैर, तु ही रे, देवा, ये रे ये रे पैसा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिचा मी सिंधुताई सकपाळ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने यासोबतच तुझं नि माझं घर श्रीमंताचं, १०० डेज यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या तेजस्विनीची आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. मात्र तिचा अभिनेत्री बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिची आई एक अभिनेत्री असली तरी तिची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. तिनेच ही गोष्ट एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितली होती.
तिनेच तिच्या वाईट दिवसांविषयी सांगितले होते की, माझ्या आयुष्यात असा एक क्षण आला होता, ज्याचा विचार कुणीही करूच शकत नाही. मात्र त्यावेळीसुद्धा मी हार न मानता आपला स्ट्रगल सुरूच ठेवला. एकवेळ अशीही होती की घरात जेवायलाही पैसे नव्हते. घरात काहीच सामान नसल्याने काय करायचे हेच कळत नव्हते. आम्ही त्यावेळी केवळ मैद्याची बिस्किटं खाऊन तीन दिवस काढले. इतकेच नाही तर हातात पैसे नसल्याने वीज बिलही भरता यायचे नाही. म्हणून जोपर्यत बिल भरण्या इतपत पैसे येत नाही तोपर्यंत अंधारातच दिवस काढले.
तेजस्विनीने या परिस्थिवर मात करत मराठी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. आता तर ती अभिनयासोबतच आणखी एक काम करत आहे. तिने अभिनेत्री अभिज्ञा भावे सोबत तेजाज्ञा या डिझाइनर ब्रॅंडला चार वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. हा ब्रँड सध्या प्रचंड लोकप्रिय आहे.