तेजस्विनी पंडित ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका, चित्रपटांतही काम केलं आहे. अभिनयाबरोबर सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या तेजस्विनीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तेजस्विनी तिच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठीदेखील ओळखली जाते. समाजातील अनेक मुद्द्यांवर ती अगदी परखडपणे तिचं मत मांडताना दिसते. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने "नोकरी मागणारा नाही नोकरी देणारा मराठी माणूस असला पाहिजे," असं कॅप्शन दिलं आहे. गडकरींचा हा व्हिडिओ एका कार्यक्रमात बोलतानाचा आहे. एका इन्स्टाग्राम पेजवरुन तो शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओत गडकरी म्हणतात, "मराठी माणसामध्ये आपल्या घरातील मुलाला बेटा रिस्क घेऊ नको...धोका घेऊ नको. आपली नोकरी कर, महिन्याला पैसे डिपोजिट कर, इन्शुरंस काढ...इन्स्टॉलमेंटवर गाडी घे...इन्स्टॉलमेंटवर घर घे आणि सुखी संसार कर...हेच आपण आपल्या मुलांना शिकवतो, हे बंद करा. नोकरी मागणारे नाही मागणारे नाही नोकरी देणारा मराठी माणूस झाला पाहिजे." तेजस्विनीच्या या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, तेजस्विनीने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. 'तू ही रे', 'येरे येरे पैसा', 'अगं बाई अरेच्चा', 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटांत ती झळकली. 'मी सिंधुताई सकपाळ' या चित्रपटातील तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. चित्रपटांबरोबरच वेब सीरिज आणि मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. 'रानबाजार', 'अनुराधा' या वेब सीरिजमध्ये तेजस्विनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.