अभिनयाबरोबरच सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलेल्या तेजस्विनीने अल्पावधीतच मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तेजस्विनी अभिनयाबरोबरच्या तिच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. समाजातील अनेक घडामोडींवरही तेजस्विनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. सध्या तेजस्विनीच्या अशाच एका ट्वीटने लक्ष वेधून घेतलं आहे.
तेजस्विनीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस टोलसंदर्भात बोलत आहेत. "आम्ही केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील सगळ्या टोलनाक्यांवर चारचाकी आणि दुचाकींना टोलमाफी देण्यात आली आहे. केवळ कमर्शिअल गाड्यांकडूनच आम्ही टोल आकारतो," असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीने संताप व्यक्त केला आहे.
"म्हणजे? यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोया? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा या टोलधाडीतून!! उपमुख्यमंत्र्यांकडून असं विधान कसं केलं जाऊ शकतं? हे अविश्वसनीय आहे. तुमच्याबरोबरही फसवणूक झाली असेल, तर शेअर करा," असे तेजस्विनीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तेजस्विनीच्या या ट्वीटने सळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या ट्वीटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पुन्हा टोलचा मुद्दा उपस्थित केला आहे. फडणवीसांच्या विधानाप्रमाणे कार, रिक्षा, टुव्हीलरना टोल माफी असेल तर मनसेचे सैनिक प्रत्येक टोलवर उभे राहून हा टोल आकारू देणार नाहीत. जर नाही झाले तर आम्ही सर्व टोलनाके जाळून टाकू, असा गंभीर इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.