'एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला'चा अकरावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये खेळात टिकून राहण्यासाठी जोड्या कठोरपणे निर्णय घेताना दिसणार आहेत. येत्या ५ ऑगस्टपासून दर रविवारी सायंकाळी ७ वाजता एमटीव्हीवर हा शो पाहता येणार आहे.
'एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला'चा अकरावा सीझन एका सामाजिक प्रयोगाभोवती फिरणार आहे, ज्यामध्ये ओरॅकल हे गणितीय अल्गोरिदम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार असून स्पर्धकांना आपला आदर्श जोडीदार निवडण्यासाठी सहाय्य करणार आहे. दहा अविवाहित पुरुष आणि नऊ अविवाहित महिला एकमेकांसोबत राहणार असून स्वतःसाठी ‘सुयोग्य जोडीदार’ शोधून काढणे हेच त्या सर्वांचे एकमेव उद्दिष्ट असेल. खेळामधले आपले स्थान अबाधित राखण्यासाठी आणि अंतिम विजेतेपदाचे सिंहासन पटकावण्यासाठी प्रत्येक स्पर्धकांकडे दोन पर्याय असतील – स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकायचा किंवा गुप्तपणे आपल्या ओरॅकलची मदत घ्यायची. या साऱ्या कहाणीमधील आणखी पेच म्हणजे प्रत्येकवेळी ओरॅकलकडून सहाय्य घेतल्यानंतर त्याचे परिणाम पाठोपाठ भोगावे लागणार आहेत. एक किंमत चुकती करावी लागणार आहे आणि काय किंमत मोजावी लागेल, ते येणारी वेळच सांगेल. जिम कॉर्बेटच्या नयनरम्य हिरव्यागार जंगलात या शोचा सेट उभारण्यात आला असून इथे प्रेमामधील दैव-नशीब की विज्ञानावरील विश्वास-भरवसा या मुद्द्यांवर सर्व जोड्यांचा कस लागणार आहे.या शोबाबत सनी लियोन म्हणाली, 'एक काळ असा होता, जेव्हा प्रेमात पडणे खूप सोपे होते आणि निवड करण्याला वगैरे फारसे महत्व नसायचे. आजची युवा पिढी मात्र अशी नाही. ते केवळ जोडीदार ठरवण्याआधी अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतात असे नाही तर त्याच्याशी निगडीत सर्वांगीण मुद्दे देखील विचारात घेऊन मगच पाउल उचलतात. एमटीव्ही स्प्लिट्सव्हिलाच्या या सत्रात स्पर्धकांना एक सेटअप मिळणार आहे, जिथे त्यांच्यापुढे केवळ विविध पर्यायांचा पेटारा असेल परंतु त्याजोडीला त्या पर्यायांचा नेमका निवाडा करण्यासाठी सल्लामसलत देखील उपलब्ध असेल.'