'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आणि शेवटी तो क्षण आला ज्याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण (Suraj Chavan) 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. तर अभिजीत सावंत(Abhijeet Sawant)ने दुसरे स्थान पटकावले. सूरज चव्हाणला बक्षीस म्हणून चांगली रक्कम मिळाली आहे. एवढेच नाही तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली.
खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वत:चे वेगळेपण दाखवले. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्यातही त्याने स्वत:ची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथवर पोहोचला आणि या पर्वाचा विजेताही ठरला.
सूरजला काय बक्षीस मिळालं?सूरज चव्हाण विजेता ठरल्यानंतर बक्षीसात १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी. तसेच दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि इलेक्ट्रिक बाईक मिळाली.
अभिजीत आणि निक्कीला काय मिळालं?उपविजेत्या अभिजीत सावंतला एक लाख रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर मिळाले. याशिवाय फर्स्ट रनर अप निक्की तांबोळीलाही एक लाख रुपयांचं गिफ्ट व्हाऊचर मिळाले. त्याआधी ग्रँड फिनालेमध्ये सहा फायनलिस्ट असताना बिग बॉसने सदस्यांना ९ लाखांची रक्कम घेऊन शोमधून बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता. त्यावेळी जान्हवी किल्लेकरने हा पर्याय निवडला आणि पैसे घेऊन शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.