Join us  

‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील राम कथेत मोठं वळण, पाहायला मिळणार राम सेतू प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 6:51 PM

Shrimad Ramayana :‘श्रीमद् रामायण’ मालिकेचे प्रेक्षक दिव्य राम कथेत आता एक मोठे वळण आलेले बघत आहेत. हनुमान लंकेहून परत येताना सीतेने दिलेला चुडामणी आपल्या सोबत घेऊन आला आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेचे प्रेक्षक दिव्य राम कथेत आता एक मोठे वळण आलेले बघत आहेत. हनुमान लंकेहून परत येताना सीतेने दिलेला चुडामणी आपल्या सोबत घेऊन आला आहे. या चुडामणीसह हनुमान सीता मातेचा संदेश श्रीरामाला देतो, रामाला लंकेच्या परिस्थितीची माहिती देतो. ते ऐकून श्रीराम सीतेला लंकेतून सुखरूप परत आणण्यासाठी सज्ज होतात आणि सुग्रीवाला सैन्य तयार करण्याचे आदेश देतात. लंकेच्या दिशेने जात असताना समुद्राच्या रूपाने एक मोठा अडथळा त्यांच्या मार्गात येतो. समुद्र पार करून जाण्याचा कोणताच मार्ग त्यांना दिसत नाही. विचलित न होता श्रीराम सागराची देवता- वरुण देवाची प्रार्थना करतात. श्रीरामाने मनःपूर्वक केलेल्या प्रार्थनेला देखील जेव्हा वरुण देव दाद देत नाही, तेव्हा श्रीरामाचे धैर्य सुटते आणि ते आपले धनुष्य उचलतात. श्रीरामाचा तो अढळ निर्धार पाहून वरुण देव प्रकट होतो आणि रामाला समुद्र पार करण्यासाठीचा उपाय सांगतो. रामायण या महाकाव्यातील ही एक लक्षणीय घटना आहे.  श्रीरामाची भूमिका करणारा अभिनेता सुजय रेऊ म्हणतो, “राम सेतूचा प्रसंग श्रीमद् रामायणातील एक लक्षणीय प्रसंग आहे, ज्यात श्रीरामाची एक वेगळी बाजू दिसते. सीतेला लंकेहून परत आणण्यासाठीच्या प्रवासात रामापुढे एक अनपेक्षित अडथळा असतो. त्या क्षणी, सीतेवरील प्रेमाने प्रेरित झालेल्या रामाची एक अत्यंत करारी आणि दृढ  बाजू आपल्याला दिसते. यावेळी श्रीराम पहिल्यांदाच संतापलेले दिसतात. याच प्रसंगातून श्रीरामाचा आणखी एक गुण दिसतो, तो म्हणजे आपल्या आसपासच्या लोकांना एकत्र आणून त्यांचा उद्धार करण्याची त्यांची क्षमता. या एकजूट केलेल्या लोकांच्या दृढ श्रद्धेतूनच पुढे राम सेतूचे निर्माण होते. अनेक संकटे येऊनही श्रीरामाची श्रद्धा, नेतृत्व आणि करुणा यामुळे प्रेरित झालेले त्याचे सहकारी एकत्र येऊन अशक्यप्राय वाटणाऱ्या आशेच्या आणि विजयाच्या सेतूच्या बांधणीचे काम साध्य करू शकले.”