Join us  

"एका हीरोइनच्या अंगात रात्री भूत गेलं, आणि तेच भूत..", मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 10:58 AM

Milind Gawali : अभिनेता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर सिनेमाचा एक किस्सा शेअर केला आहे.

अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali ) टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या ते आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत काम करत आहेत. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. तसेच ते त्यांनी काम केलेल्या चित्रपटांचे किस्सेदेखील शेअर करत असतात. दरम्यान मिलिंद गवळी यांनी एक किस्सा सांगितला आहे.

मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, "आर आर आबा आता तरी थांबा" रीमा अमरापूरकर दिग्दर्शित आणि सदाशिव अमरापुरकर निर्मित हा माझा एक भन्नाट ग्रामीण मराठी चित्रपट, ज्याचं शूटिंग करताना सुद्धा खूप धमाल आली, आणि चित्रपट बनल्यानंतर सुद्धा तो चित्रपट खूपच भारी झाला, ग्रामीण सामाजिक विषय आणि धमाल विनोदी चित्रपट, एकापेक्षा एक अफलातून कलाकार, स्वतः सदाशिव अमरापुरकर , सतीश तारे बरेचसे जळगावचे कलाकार, विनोद ढगे. माझा सगळ्यात आवडता कलाकार सतीश तारे, सतीश बरोबर "गणू मामा" नावाची श.णा. नवरे लिखित एक सिरीयल केले होते, सतीश तारेच्या अभिनयाने मी खूपच प्रभावित झालो, त्याच्यासारखा प्रतिभावान कलाकार मी इतक्या वर्षात कधीही पाहिला नाहीये.

त्यांनी पुढे म्हटले की, सदाशिव अमरापुरकरांबरोबर मी "सखा भाऊ पक्का वैरी" हा सिनेमा करत होतो, तेव्हाच मला त्यांनी सांगितलं की मी एक चित्रपट बनवत आहे आणि मला तू त्या चित्रपटांमध्ये काम करावंस असं वाटतं, आणि मी तेव्हाच त्यांना हो म्हणून सांगितलं होतं, आणि काही महिन्यातच त्यांनी मला साइन केलं, या चित्रपटानंतर मी त्यांच्याबरोबर "धनगर वाडा" नावाचा एक चित्रपट केला होता, एकूण तीन सिनेमांमध्ये मी सदाशिव अमरापुरकरांबरोबर काम केलं, सदाशिव अमरापूरकर हे दिग्गज कलाकार, "अर्धसत्य" आखरी रास्ता "सडक" यात काय भन्नाट काम केलं होतं, इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर आपल्याला काम करायला मिळतं याचं मला खरंच खूप समाधान होतं, जळगाव पासून जवळ एक वाकोद नावाच्या गावात आम्ही शूटिंग करत होता, एमटीडीसीच्या गेस्ट हाऊस मध्ये आम्ही राहत होतो, वाकोद या गावाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला होता, छान गाव होतं, त्या गावातले किस्सा मला आठवतात, संजय मेमाणे कॅमेरामन होता, त्याने सांगितलं रस्त्यावर पाणी शिंपडायला, सिनेमॅटिकली ते छान वाटेल, ज्या घराध्ये आम्ही बसलो होतो, त्या घरात एक असिस्टंट धावत आला, दोन बदला पाणी घेऊन गेला रस्त्यावर शिंपडायला, अजून पाणी लागणार म्हणून परत धावत आला, तर त्या घरातली एक मावशी म्हणाली, ही एक बादली तरी पाणी आम्हाला राहू द्या, नंतर त्या मावशीने कारण सांगितलं, गावत आठवड्यातनं दोनच वेळा पाणी येत,  या बादलीतलं पाणी जर तुम्ही रस्त्यावर शिंपडलं, तर पुढचे दोन दिवस घरामध्ये पाणी येणार नाही.

''भूत पळवायचा रात्रभर प्रयत्न करत होत्या...''

दुसरा किस्सा म्हणजे त्या वाकोद गावामध्ये एक बंद पडलेल्या मिल मध्ये आम्ही एक दिवस शूटिंग केलं, दुसऱ्या दिवशी शूटिंगला निघालो तेव्हा कळलं की एका हीरोइन च्या अंगात रात्री भूत गेलं, आणि तेच भूत दुसऱ्या दिवशी दुसरे हिरोईनच्या अंगात गेलं, सविता मालपेकर आणि प्रिया बेर्डे देवाचं नाव घेत त्या हिरोईनच्या अंगातून भूत पळवायचा रात्रभर प्रयत्न करत होत्या, असे त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले.

टॅग्स :मिलिंद गवळी