नवा गडी नवं राज्य (Nava Gadi Nava Rajya) मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Patil) पाहायला मिळते. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे, कीर्ती पेंढारकर यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना मालिका पाहायला आवडते. मालिकेत वर्षा या पात्राच्या आयुष्यात तिला खूपच अडचणींचा सामना करताना पाहायला मिळाली. पण आता तिच्यासाठी मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री करण्यात आली आहे. शिवानंद गावडे उर्फ नंदू हे नवीन पात्र मालिकेत पाहायला मिळत आहे. नंदूची भूमिका शेखर फडके (Shekhar Phadke) साकारत आहे.
शिवानंद गावडे उर्फ नंदू हा वर्षा हिच्या कॉलेजमध्ये एकत्र शिकत असल्याचे तिने सांगितलं आहे. नंदू हा आनंदी कडून गुढी पाडव्याच्या गुड्यांची ऑर्डर मिळवताना दाखवले आहे. इथेच वर्ष आणि नंदूची पुन्हा भेट होते. शेखर फडके नंदू हे पात्र उत्तम निभावताना पाहायला मिळत आहेत.
अगदी बालपणापासूनच तो उत्तम अभिनय करताना पाहायला मिळतो. आई पाहिजे चित्रपटात पहिल्यांदा शेखरला खलनायक साकारण्याची संधी मिळाली आणि अशाच भूमिकांची गोडी त्याच्यात निर्माण होत गेली. पाचवीत असताना त्याने रायगडाला जेव्हा जाग येते नाटकात बालपणीचे राजाराम साकारले होते. मग इथूनच अभिनयाला खरी सुरुवात झाली. भांडुपच्या विद्यामंदिर शाळेत शिकत असताना शाळेचे मुख्याध्यापक विश्वासराव धुमाळ हे लेखक दिग्दर्शक होते. त्यांच्या प्रोत्साहनाने कुमार कला केंद्रात बक्षीस मिळाले. सातवीत असताना आई पाहिजे चित्रपटात अभिनेते रमेश भाटकर यांच्या बालपणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ही भूमिका छोटीशी जरी असली तरी खलनायक साकारायची आवड इथूनच त्याच्यात निर्माण झाली. त्यानंतर खलनायकी ढंगाच्या भूमिकेनी त्याची पाठ सोडली नाही विठू माऊली मालिका असो वा सरस्वती मालिका यातून त्याने साकारलेला खलनायक काहीशा विनोदी वलयाचा दिसला.