झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांचा चांगलाच आवडता आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना आवडतात. या कार्यक्रमातील अरविंद जगताप यांची पत्रं तर प्रेक्षकांना प्रचंड भावतात. या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील देखील प्रसिद्ध कलाकार आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करायला येतात. पण या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील एका व्यक्तिरेखेमुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे आगरी-कोळी भूमिपुत्र संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या टीमने आगरी-कोळी समाजाची जाहीर माफी मागावी असे त्यांनी कार्यक्रमाच्या टीमला सांगितले आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या ५ आणि ६ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात आलेल्या दिवाळी पहाटमध्ये विविध गायक, कवी अशी पात्रं प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्यात आगरी कवी मिथुन भोईर उर्फ अधोक्षज भोईरचे एक विनोदी पात्र दाखवण्यात आले होते. हे नाव आगारी समाजात अत्यंत अभावाने आढळत असल्याचे अॅड. भारद्वाज लक्ष्मण चौधरी यांनी पत्र लिहून सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, आगरी पात्राद्वारे तुम्ही विनोदाची निर्मिती केल्यास आम्हाला काहीही हरकत नाही. पण कोणत्याही कार्यक्रमाद्वारे आगरी समाजावर टीका करण्यास कोणालाही अधिकार नाही. आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने बजावले आहे की, आमच्या समाजाचा अपमान केल्याप्रकरणी या कार्यक्रमाच्या टीमने माफी मागावी.
आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून याबाबत कळवले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, आगरी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सात दिवसांत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा इशारा या संघटनेने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना दिला आहे. आता हे पत्र मिळाल्यानंतर कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून आणि झी वाहिनीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहाणे रंजक ठरणार आहे.