‘आई कुठे काय करते’ (Aai Kute Kay Karte) या लोकप्रिय मालिकेतील अनिरूद्ध अर्थात अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) हा एक लोकप्रिय अभिनेता. मिलिंद गवळीने आपल्या करिअरमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठीच नव्हे तर मल्याळम तसेच हिंदी चित्रपटांतही त्याने काम केलंय. पण सध्या चर्चा त्याची नाही तर त्याच्या लेकीची आहे.
होय, मिलिंदने लेकीचा एक खास व्हिडीओ शेअर करत, तिचं कौतुक केलं आहे. मिलिंद गवळीच्या लेकीचं नाव मिथिला आहे. चार वर्षांपूर्वी ती दिग्विजय कदमसोबत विवाहबद्ध झाली. डान्स टीचर, फिटनेस ट्रेनर अशी तिची ओळख आहे. घोडेस्वारीमध्ये तिला विशेष रस आहे.
लाडक्या मिथिलाचा व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटलं की, ‘आज मला माझ्या लेकीचा अभिमान आहे. तिने कोणतं प्रोफेशन निवडलं तर फिटनेस ट्रेनर. माझी मुलगी मिथिलाने फिटनेस ट्रेनर म्हणून काम करायचं ठरवलं,तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं. यानंतर तिचा निर्णय आणि त्यासाठी ती घेत असलेली मेहनत पाहून मला आणखीच आश्चर्य वाटलं. प्रत्येक दिवशी तिची प्रगती, तिची मेहनत व तिचा उत्साह पाहतो तेव्हा मला बाप म्हणून अभिमान वाटतो. मला माझ्या घरातूनच कामाची प्रेरणा मिळते. माझ्या दोन पिढ्यांकडून मला प्रेरणा मिळते त्यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. एक पिढी म्हणजे माझे वडील श्रीराम गवळी. जे अजूनही माझ्यापेक्षा अधिक मेहनत घेतात. दुसरी पिढी म्हणजे माझी मुलगी मिथिला. मला त्याचं कौतुक वाटतं. अभिमान वाटतो...’
मिलिंदच्या मुलीचा फिटनेस रुपेरी पडद्यावरील अभिनेत्रींनाही लाजवणारा आहे. मिलिंदने हा व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्याच्या लेकीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.